मराठीतून बोलल्याने ८० हजारांचा दंड

सांगली – गेल्या काही दिवसापासून जातपंचायतीचे एक एक प्रताप उघडे होत असून जात पंचायतीने एका व्यक्तीला मराठीतून बोलल्या८० हजारांचा दंड ठोठावला. ही घटना तीन वर्षांपूर्वी सांगली येथील गोसावी समाजाच्या कार्यक्रमामध्ये घडली. गोसावी भाषेत न बोलता मराठीतून बोलल्याने, जात पंचायतीने शिवाजी जाधव या व्यक्तीला ८० हजारांचा दंड ठोठावला. मात्र शिवाजी जाधवांनी न्यायालयात धाव घेतल्याने संतापलेल्या जात पंचायतीने जाधव यांच्या मुलीला माहेरी पाठवले आहे.

शिवाजी जाधव गेली दोन वर्षे न्यायालयात जात पंचायतीविरोधात लढत आहेत, पण प्रश्न मात्र ठप्प आहे.शिवाजी जाधव यांच्या मुलीचं तीन वर्षांपूर्वी लग्न चेतन मुळेकर या तरुणाशी झाले. यानंतर मुलीच्या नंदेचा डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जाधव यांना आमंत्रण आले. जाधव यावेळी गोसावीऐवजी मराठीतून बोलले. मात्र ही बाब तिथे असलेल्या पंचांना खटकली आणि पंचांनी जाधव यांना ८० हजारांचा दंड ठोठावला. तसेच जातपंचायतीने जाधव यांना समाजातून बहिष्कृत केले आणि मुलीला माहेरी पाठवलं.

या घटनेला दोन वर्ष उलटली असून दरम्यानच्या काळात मुलीच्या नव-याने दुसरे लग्नही केले आहे . अखेर मुलीच्या हक्कासाठी जाधव यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र मिरज न्ययालयात दोन वर्षांपासून तारखांवर तारखा पडत आहेत. भाषेच्या वेड्या अट्टाहासापायी एका निष्पाप महिलेच्या संसार उद्धवस्त झाला आहे.