पहिला कृत्रिम बर्गर प्रयोगशाळेत तयार

लंडन – जगात खाद्य पदार्थाशी संबंधित तंत्रज्ञानात क्रांती घडविणारा पहिला कृत्रिम बर्गर नेदरलँडच्या एका प्रयोगशाळेत तयार करण्यात आला. १४० ग्रॅम वजनाचा हा बर्गर बीङ्ग बर्गर असून त्याची किंमत अडीच लाख यूरो एवढी आहे. या बर्गरचे वैशिष्ट्य असे की, त्यासाठी लागलेले गोमांस हे गायीची कत्तल न करता किंबहुना गायीचा वापर न करता प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार केलेले आहे. गायीच्या शरीरातील एक पेशी घेऊन तिच्यापासून प्रयोगशाळेत कृत्रिम मांस तयार करण्यात आले आणि या मांसाचा वापर करून हा बर्गर तयार करण्यात आलेला आहे.

या पहिला कृत्रिम बर्गरसाठी गोमांसा व्यतिरिक्त मीठ, अंड्याची पावडर इत्यादींचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याला आकर्षक रंग यावा यासाठी बीटरूटचा रस आणि केशर यांचा वापर केलेला आहे. त्याची चव सध्या प्रचलित असलेल्या बर्गरसारखीच आहे. त्यामुळे कृत्रिमरित्या मांस तयार करण्याच्या प्रक्रियेत यश आल्याचे मानले जात आहे. नेदरलँडच्या मॅस्ट्रिच विद्यापीठातील प्रा. मार्क पोस्ट यांनी हा प्रयोग यशस्वी केला असून हे कृत्रिम मांस नैसर्गिक मांसाइतकेच पौष्टिक असून त्याचा वापर करणार्‍यांसाठी निर्धोक असल्याचे म्हटले आहे.

सध्या जगामध्ये मांसाहार करणार्‍यांची संख्या वाढत आहे आणि त्यांच्याकडून मांसाची मागणी होत आहे. ती पूर्ण करण्यासाठी जनावरे पाळावी लागतात आणि त्यांच्या चार्‍यावर खूप खर्च करावा लागतो. त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. याचा विचार करून मार्क पोस्ट यांनी आपल्या प्रयोगशाळेत गायीच्या एका पेशीपासून कृत्रिमरित्या मांस तयार केले आहे. अशा प्रकारे मांस तयार व्हायला लागल्यास अन्न तंत्रज्ञानात क्रांती होणार आहे, असा दावा त्यांनी केला.