जपानी युद्धनौकेचे जलावतरण साजरे

टोकियो -दुसर्‍या महायुद्धानंतर प्रथमच जपानने प्रचंड मोठ्या लढाऊ नौकेचे जलावतरण मंगळवारी केले आहे. विशेष म्हणजे शेजारी चीनबरोबर सुम्रदातील कांही बेटांच्या मालकीबद्ल जपान आणि चीन संघर्ष सुरू असताना या नौकेचे जलावरण झाल्याने त्याला विशेष महत्व दिले जात आहे. योकोहामा बंदरात टोकियो मिलिटरीतर्फे हे जलावतरण संपन्न झाले असल्याचे समजते.

ही युद्धनौका जपानी नौदलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. २४८ मीटर म्हणजे ८१० फुटाच्या या नौकेची नऊ हेलिकॉप्टर्स वाहून नेण्याची क्षमता आहे. बर्‍याच वर्षापूर्वी या नौकेची घोषणा केली गेली होती. जपानी नौदलाच्या ताफ्यात असलेली आत्तापर्यंतची मोठी युद्धनौका केवळ दोन हेलिकॉप्टर्स वाहून नेण्याची क्षमता असलेली आहे. या नव्या जहाजामुळे आपत्कालीन आणीबाणी तसेच सुटका ऑपरेशन्स राबविताना मोठी मदत मिळणार आहे. हे जहाज जपानच्या सागरी तसेच भूभागाचे रक्षण करण्यास सक्षम असल्याचे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.

दोन आठवड्यांपूर्वीच चीनच्या तटरक्षक दलाच्या नौका जपानी हद्दीत आल्या होत्या. पूर्व चीनच्या समुद्रात असलेली कांही बेटे जपान आणि चीन यांच्यातील मालकी बाबत वादात असून ही बेटे मासेमारीसाठी तसेच सागरी संपत्तीसाठी ओळखली जातात.