पुणे – सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक मंजुर केले जाईल असे पत्र समाजसेवक व जनलोकपाल आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाले असल्याचे अण्णांचे सहकारी दत्ता आवारे यांनी सांगितले. ते म्हणाले की पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी हे पत्र पाठविले आहे.
अण्णांनीही या पत्राला तातडीने उत्तर दिले असून त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिग यांना पत्र लिहिले आहे. त्यात जनलोकपाल विधेयक यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झाले नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून रामलिला मैदानावर पुन्हा बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे. या पत्राच्या प्रती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मंत्री कपिल सिब्बल यांनाही पाठविल्या गेल्या आहेत असेही आवारी यांनी सांगितले.
आवारी म्हणाले की अण्णांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात २७ ऑगस्ट रोजी रामलिला मैदानावर अण्णांचे उपोषण सुरू असताना पंतप्रधानांनी स्वतःच्या हस्ताक्षरात जनलोकपाल लवकरात लवकर मंजूर केले जाईल असे लिहून दिल्याची आठवणही करण्यात आली आहे आणि दोन वर्षे उलटल्यानंतरही पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन अजून पुरे केले नसल्याची जाणीवही करून देण्यात आली आहे.