महात्मा गांधी यांनी म्हटले होते, सत्यमेव जयते. याचा अर्थ आहे सत्याचा कधी ना कधी विजय होतोच. पण सत्याचा विजय होण्याआधी सत्य कळावे लागते. भारताच्या एकंदर राजकीय वाटचालीमध्ये भारतातली गरिबी हटत का नाही हेच लोकांना कळत नव्हते. या वाढत्या गरिबीमागचे सत्य कारण काय आहे याचा लोकांना बोधच होत नव्हता. पण तो आता झाला आहे आणि आपल्या देशावर बहुसंख्य काळ राज्य करणार्या कॉंग्रेस पक्षाचा गरिबीकडे बघण्याचा दृष्टीकोन हेच गरिबी न हटण्याचे कारण आहे हे आता लक्षात आले आहे. काय आहे या पक्षाचा हा दृष्टीकोन? या पक्षाला गरिबी ही आर्थिक अवस्था आहे हे मान्यच नाही. त्यांच्या मते गरिबी ही मानसिक अवस्था आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबीविषयीचा आपल्या पक्षाचा हा दृष्टीकोन काल एका समारंभात बोलताना मांडला आहे. गरिबी ही आर्थिक नसतेच असे जर या पक्षाचे मत असेल तर या पक्षाने गरिबी हटविण्यासाठी केलेले आर्थिक प्रयत्न हे एक ढोंगच असणार यात काही शंका नाही आणि हेच गरिबी न हटण्याचे खरे कारण आहे.
राहुल गांधी हे असे काही बोलायला लागले की त्याची काळजी वाटते. कारण शेवटी ते सत्ताधारी पक्षाचे जबाबदार नेते आहेत आणि ते जे काही बोलतात त्यातून त्यांच्या धोरणांचे सूचन होत असते. गरिबी म्हणजे नेमके काय आणि देशात कोणाला गरीब म्हणावे याचा आर्थिक निकष याच सरकारच्या नियोजन आयोगाने निश्चित केला आहे आणि तोही वादाचा विषय झाला आहे. याच वातावरणात राहुल गांधी यांनी गरिबी हा मनाचा धर्म असल्याचा नवा शोध लावला आहे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष गरिबीची अन्न, वस्त्र, निवारा या गरजांशी संबंधित व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो प्रयत्न चुकीचा आहे. मुळात गरिबी वगैरे काही खरे नाही. लोक स्वत:ला गरीब समजतात म्हणून ते गरीब आहेत. त्यांनी स्वत:ला श्रीमंत समजावे, तसे ते समजायला लागले की त्यांची गरिबी हटलीच म्हणून समजा असेच त्यांना सूचित करायचे आहे. कॉंग्रेस पक्षाची समजूत अशीच असावी असे आजवर बोलले जात होते आणि त्यामुळेच कॉंग्रेसचे नेते गरिबी हटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत नव्हते. कारण ती हटवायची नसतेच. ती लोकांच्या मनात असते. तेव्हा गरिबांसाठी स्वस्तात धान्य देणे, त्यांना कर्जात सवलती देणे, त्यांची कर्जे माङ्ग करणे, त्यांना स्वस्त घरे देणे असे हे सगळे उपाय मुळात गरिबी हटविण्यासाठी नाहीतच.
हे सगळे उपाय मतांसाठी आहेत आणि म्हणूनच यातले बरेच उपाय निवडणुकीच्या तोंडावरच योजिले जात असतात. मुळात देशात गरिबी आहे याचा शोध १९७१ साली सुरुवातीला इंदिरा गांधी यांना लागला आणि त्या वर्षीच्या निवडणुका जिंकून त्यांना कॉंग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवायचे होते म्हणून त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. तेव्हापासून कॉंग्रेस पक्ष सातत्याने गरिबांच्या नावाने राजकारण करत आहे आणि त्यांची गरिबी हटविण्याची आमिषे दाखवून त्यांची मते मिळवत आहे. १९७१ साली इंदिरा गांधींनी दिलेला गरिबी हटावचा नारा प्रामाणिकपणाचा असता तर गेल्या ४२ वर्षांमध्ये गरिबी हटायला हवी होती. पण ती हटली नाही, अजूनही शिल्लक आहे आणि एकामागे एका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे नेते पुन्हा पुन्हा गरिबांच्या कल्याणाच्याच वल्गना करून मते प्राप्त करत आहेत. मात्र गरिबांना वारंवार हा प्रश्न सतावत होता की, प्रत्येक निवडणुकीत गरिबीचेच भांडवल का करावे लागते? एखाद्या वेळी तरी आता गरिबी हटली आहे असे चित्र का निर्माण होत नाही? या प्रश्नाचे उत्तर आता राहुल गांधींनी दिले आहे. या उत्तरातच कॉंग्रेसचा आजवरचा दृष्टीकोन प्रतिबिंबित झाला आहे. कॉंग्रेसला मुळात गरिबीची आर्थिक व्याख्याच मान्य नाही. ती मानसिक अवस्था आहे हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचेच मत दिसत आहे. म्हणूनच आपल्या निवडणुकीच्या स्वार्थाकरिता वापरण्यासाठी त्यांनी आर्थिक गरिबी शिल्लक ठेवलेली आहे.
गरिबी खरोखर कमी झाली तर लोक लाचार राहणार नाहीत, अशी भीती कॉंग्रेसला वाटते. लोकांना उपाशी ठेवा तरच निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर सरकारी खर्चाने धान्य आणि पैसा ङ्गेकून त्यांची मते घेता येतात हेच कॉंग्रेसचे तत्वज्ञान आहे. गरिबी ही हटवता येते, पण गरिबी हटल्यास काय होईल याची कॉंग्रेसला भीती वाटते. गरिबीतून बाहेर पडून स्वाभीमानी झालेला माणूस उपकाराच्या बदल्यात कॉंग्रेसला मतदान करणार नाही ही कॉंग्रेसची भीती आहे. म्हणूनच गावागावामधून लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे नाटक करून कॉंग्रेसने आपली मतपेढी बांधलेली आहे. गरिबी हटविण्याच्या कॉंग्रेसच्या घोषणा हे एक ढोंग आहे. ती गरीब माणसाची ङ्गसवणूक आहे. मात्र आजपर्यंत ही गोष्ट इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी कधी लोकांना सांगितली नव्हती. ती आता राहुल गांधींनी सांगितली आहे. काही का असेना राहुल गांधी यांच्या तोंडून सत्य बाहेर पडले आहे. गरिबी ही काही मानसिक अवस्था नाही, ती आर्थिकच अवस्था आहे आणि त्या अवस्थेला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे हे सत्य आहे. पण सत्ताधारी पक्ष तसे मानत नाही आणि गरिबांची चेष्टा करण्यावर पक्षाचा विश्वास आहे हे सत्य लोकांना आता समजायला लागले आहे.