आता रुग्णांना मिळणार सरकारी दवाखान्यातच औषधी

वर्धा – सरकारी रुग्णालयात गरीबांना उपचार तर मिळतात परंतु डॉक्टरांकडून देण्यात येणार्‍या औषधांच्या यादीने गरीब रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे रुग्णांना नईलाजास्तव खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. परंतु वर्ध्यात आता गरीब रुग्णांची ही धावपळ बंद झाली आहे. येथील सरकारी रुग्णालयात विना प्रिस्क्रीप्शन’ ही प्रायोगिक स्तरावरील योजना राबवण्यात आली असून या योजनेमुळे रुग्णांना आता औषधांसाठी बाहेर भटकावे न लागता त्यांना आवश्यक ती सर्व औषधे रुग्णालयातच देण्यात येत आहेत.

खासगी रुग्णालय आवाक्याबाहेर ठरत असल्यामुळे गरीब रुग्ण सरकारी रुग्णालयाचा आधार घेतात. परंतु सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी बाहेरुन घ्यावी लागत असल्याने रुग्णांच्या खिशाला इथेही चटका बसतोच. परंतु वर्ध्यात रुग्णांसाठी सरकारी दवाखान्यांमध्ये सुरु झालेल्या विना प्रिस्क्रीप्शन’ या सुविधेमुळे रुग्णांची डोकेदुखी कमी झाली आहे.

या सुविधे अंतर्गत रुग्णांना पर्यायी औषध रुग्णालयातच उपलब्ध करुन दिले जात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण आरोग्य रुग्णालयासह जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रांमध्येही ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील वर्ध्यासह सातारा जिल्ह्यातही ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेमुळे रुग्णांच्या औषधीच्या अतिरिक्त खर्चातुन सुटका होणार आहे. तसेच ही योजना योग्य पद्धतीने राबवत सरकारी दवाखान्यातील इतर सेवेतही सुधारणा करण्याची गरज असल्याचे रुग्णालयातील रुग्णांनी मत व्यक्त केले.