हैदराबाद – आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर हैदराबाद ही दोन राज्यांची संयुक्त राजधानी असेल असे ठरलेले आहे, परंतु ही व्यवस्था कायमची असणार नाही, तिला कायम संयुक्त राजधानी करण्याचा किंवा हैदराबाद शहराला चंडीगढ प्रमाणे संयुक्त राजधानी करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशारा तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.
हैदराबादवरून वाद सुरू
हैदराबाद ही दहा वर्षांसाठीच संयुक्त राजधानी राहणार आहे आणि दरम्यानच्या काळात उर्वरित आंध्र प्रदेशासाठी नवी राजधानी निवडून तिचा तसा विकास केला जाणार आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी तेलंगणाला मान्यता देताना ही गोष्ट स्पष्टपणे नमूद केलेली आहे याकडे चंद्रशेखर राव यांनी लक्ष वेधले. आंध्र प्रदेशातील काही नेते हैदराबादला कायम संयुक्त राजधानी करावी, अशी मागणी करत आहेत. ती नव्या वादाला तोंड ङ्गोडणारी ठरेल असा इशारा चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.
हैदराबादमध्ये नोकरी करणार्या उर्वरित आंध्र प्रदेशातील कर्मचार्यांनी तेलंगणाच्या आणि हैदराबादच्या बाहेर जावे असे आपण म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, पण ते चुकीचे असून आपण असे म्हणालेलो नाही असा खुलासा चंद्रशेखर राव यांनी केला. या कर्मचार्यांनी हैदराबादमध्ये रहावे, दहा वर्षात निवृत्त होत असतील तर येथेच निवृत्त व्हावे आणि निवृत्तीनंतर हैदराबादमध्येच फ्लॅट घेऊन रहावे त्यास आपला विरोध असणार नाही, असे चंद्रशेखर राव म्हणाले.
आंध्र प्रदेश अखंड असताना नोकर्या, पाणी अशा अनेक मुद्यांवरून तेलंगणाला दुजाभावाने वागवले गेले आहे आणि तेलंगणाने खूप नुकसान सहन केलेले आहे. त्यामुळे आता या प्रश्नांवर तेलंगणातल्या जनतेला स्वत:चा निर्णय घेता येईल, अशी आशा श्री. राव यांनी व्यक्त केली.
