सुब्रह्मण्यम स्वामीं आदिती रेस्टॉरंटमध्ये

मुंबई दि.५ – गेल्या कांही दिवसांत देशभरात चर्चेत आलेल्या परळ विभागातील आदिती रेस्टॉरंटमध्ये जनता दलाचे प्रमुख डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी अचानक भेट देऊन तेथील पदार्थांचा आस्वाद घेतला. या हॉटेलमध्ये दिल्या जाणार्‍या बिलांवरील मजुकराचा इश्यू करून युवा काँग्रेसने हे हॉटेल बंद करायला लावले होते. त्यानंतर हे रेस्टॉरंट एकदमच चर्चेत आले. स्वामी या रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी थेट विमानाने आले. ते येताच त्यांच्या समर्थकांनी आणि पाठिराख्यांनी येथे एकच गर्दी केली. स्वामी कोणतीही पूर्वसूचना न देताच येथे आल्याचे समजते.

स्वामी येथील पदार्थांचा आस्वाद घेतानाच म्हणाले की हॉटेल मालक श्रीनिवास शेट्टी यांना समर्थन देण्यासाठी मी आलो आहे. युवा काँग्रेसने केलेला प्रकार म्हणजे दहशतवादी कृती आहे मात्र मुंबईच्या नागरिकांनी या कृतीला केलेल्या विरोधाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. शेट्टी यांदी बिलावर छापलेला संदेश हा त्यांचा दृष्टीकोन असून देशाच्या घटनेतील १९ कलमानुसार येथे प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

राज बब्बर यांच्या १२ रूपये जेवणाच्या कॉमेंटवरही स्वामी यांनी टीका केली तसेच नितीश राणे यांनी गुजराथी व मोदी यांच्यावरील टीकेचाही समाचार घेतला. मोदींची प्रशंसा करताना स्वामी यांनी या देशाचे नागरिक प्रथम भारतीय आहेत आणि मग ते गुजराथी, पंजाबी, महाराष्ट्रीयन आहेत असे सांगताना राणे यांचे विधान राष्ट्रविरोधी असल्याने ते मागे घ्यावे आणि त्याबद्दल माफी मागावी असे मत व्यक्त केले.

Leave a Comment