पुणे, -नौदलाची ताकद वाढेल असे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे लष्करी जहाज सध्या कोचीनबंदरात तयार होत असून ते या आठवड्यात दाखल होणार आहे, असे भारताचे नौदलप्रमुख अँडमिरल डी. के. जोशी जनरल बी जी जोशी व्याख्यानमालेत बोलताना सांगितले. पुणे विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिक विभाग आणि लष्कराचे दक्षिण क्षेत्र मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘ राष्ट्रीय समृद्धीसाठी भारतीय नौसना : समुद्र शक्ती‘ हा व्याख्यानाचा विषय होता. यावेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू आणि विभागप्रमुख डॉ. अरुण दळवी उपस्थित होते.
ते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. देशात आयात होणार्या 90 टक्के वस्तू सागरी मार्गाने येतात. त्यामुळे सुमारे 70 टक्के परदेशी चलन मिळते. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी नौदलावर आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व आहे. ते अधिक कडक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले आणि ती वाढविण्यात आली आहे. भारतीय बनावटीचे लढाऊ जहाज बांधणीचे काम कोचीतील बंदरावर पूर्ण झाले असून, हे जहाज येत्या आठवड्यात नौदलात दाखल होणार आहे. त्यामुळे नौसेनेची ताकद वाढणार आहे, असेही जोशी यांनी सांगितले.
संरक्षण-सिद्धता आणि विकास या परस्पर विरोधी बाबी नसून, परस्पर-पूरक आहेत. आर्थिक समृद्वीसाठी सागरी-संपत्तीचे संरक्षण करणे गरजेचे असून यात नौदलाची महत्वपूर्ण भूमिका आहे. भारताच्या तिन्ही दिशांना असणार्या सागरी किनार्यामुळे प्राचीन काळापासून सागरमार्गे भारताचे इतर देशांशी व्यापारी-संबंध होते. स्वातंत्र्योतर काळात, स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने सागरी सामर्थ्य वाढविण्यासाठी, सरकार आणि नौदलाने घेतलेल्या पुढाकारांचा जोशी यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. कुलगुरू डॉ. गाडे यांनी त्यांचे स्वागत केले, तर कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी आभार मानले.