द. आफ्रिकेच्या पर्यटनात भारत आघाडीवर

पुणे : डॉलरच्या तुलनेत रुपया दुबळा होऊनही भारतातून परदेशी जाणारे पर्यटक कमी झाले नसून त्यात दुप्पट वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेत त्यामुळे ५ ५ ० कोटी रुपयांची भर घातली जाते, अशी माहिती भारतातील दक्षिण आफ्रिका पर्यटन विभागाच्या प्रमुख हनेली श्लाबर यांनी दिली.

दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन स्थळाला भेटी देणार्‍या पर्यटकांमध्ये देशाबाहेरून येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण ३ . ४ टक्के आहे. त्यात एकट्या भारतातून येणारे पर्यटक २ टक्के आहे. यावरून दक्षिण आफ्रिकेला भारतीय पर्यटकांचा किती फायदा होतो हे लक्षात येईल. असे नमूद करून त्या म्हणाल्या की, केवळ पर्यटनच नव्हे तर रोजगार निमिर्तीच्या अन्य क्षेत्रातसुध्दा भारतीयांचा वाटा मोठा आहे.

देशातील १ ५ शहरात लर्न साउथ आफ्रिका कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे ही दोन शहरे आहेत. या कार्यक्रमात देशातील पर्यटन संस्थातील कर्मचारी भारतीय पर्यटकांना कोणती उत्पादने आणि सेवा द्यायच्या याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यानिमित्त हनेली श्लाबर पुण्यात आल्या आहेत.

भारतातून मिळणारा प्रतिसाद पाहून यंदा पर्यटकाला मिळणार्‍या सेवा १४ वरून १०० केल्या जात आहेत, अशी माहिती देऊन त्या म्हणाल्या की सुमारे पाच लाख भारतीय पर्यटक यंदा आफ्रिकेत येतील. गेल्या वर्षीपेक्षा त्यात ६० हजाराने वाढ होणार आहे. भारतीय पर्यटक आमच्या देशात इतरांपेक्षा अधिक दिवस राहतात आणि भरपूर प्रमाणात खर्च करतात. डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ आफ्रिका दौरा करणार असल्याने त्या अनुषंगाने सामने पाहण्यास येणारे लोक वाढतील असा अंदाज आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटीपेक्षा एक दिवसीय सामने अधिक ठेवल्याने चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

Leave a Comment