टाटांच्या इंडियन हॉटेल कंपनीची नवी ३६ हॉटेल्स

मुंबई दि.५ – भारताची सर्वात मोठी हॉटेल्स चेन कंपनी असलेल्या टाटा ग्रूपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीने आगामी चार वर्षात व्यवसाय विस्तारासाठी किमान ३६ नवी हॉटेल्स सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्रात मंदी असतानाही कंपनी व्यवसाय विस्तार करत आहे. या नव्या हॉटेल्समुळे कंपनीची क्षमता ३० टक्कयांनी वाढणार आहे. या ३६ हॉटेल्सपैकी दोन परदेशात सुरू केली जाणार आहेत.

कंपनीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री या संदर्भात म्हणाले की सध्या जागतिक मंदी आणि हॉटेल व्यवसायात असलेली स्पर्धा ही कंपनीपुढची आव्हाने आहेत. मात्र तरीही इंडियन हॉटेल्स कंपनीने या क्षेत्रात आपले नेतृत्त्व कायम राखले आहे. नव्या हॉटेल्समुळे आमच्या हॉटेल्सची संख्या १५६ वर जाणार असून प्रवाशांसाठी १९९३७ रूम्स उपलब्ध होऊ शकणार आहेत. यातील बहुसंख्य हॉटेल्स गेट वे ब्रँडखाली सुरू केली जाणार आहेत.

गेल्या वर्षातही कंपनीने सात नवी हॉटेल्स सुरू केली आहेत. नव्या प्रकल्पात बांद्रा येथील पूर्वीच्या सी रॉकच्या जागेवर ३२६ खोल्यांचे नवे हॉटेल उभारले जाणार असून ही जागा विमानतळाला अगदी जवळ आहे. तसेच ताज दुबई आणि ताज अंदमान या र्हाटेल्सचा विस्तार केला जाणार आहे.भारतात बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय हॉटेल चेन्स आहेत त्यामुळे या चेन्सबरोबर कंपनीला तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे कंपनीला गतवर्षी २७७ कोटी रूपयांचा तोटा होऊनही भागधारकांना कंपनीने डिव्हीडंट वाटप केले आहे.

Leave a Comment