मुंबई दि.५ – गेली दोन दशके भारतावर अप्रत्यक्ष दहशत असलेला कुप्रसिद्ध अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कमावलेल्या काळ्या पैशातून भारतात किमान ८० हजार कोटींच्या मालमत्ता केल्या असल्याचे अंडरवर्ल्डशी संबंधित सूत्रांकडून समजते. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर परदेशात पळून गेलेल्या आणि भारताने त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले असूनही दाऊदने भारतात उभारलेली दुनिया आजही तशीच असल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.
दाऊदच्या मालकीच्या मालमत्ता दिल्ली, मुंबई, नॉयडा, लखनौ, इंदौर, जयपूर, चंदिगड, नाशिक, कोकण, ठाणे, अहमदाबाद, सूरत,नवसारी, पोरबंदर, जोधपूर, डेहराडून, हरियाणा, केरळ, हैद्राबाद, बंगलोर, गोवा अशा ठिकाणी असून त्यांची संख्या किमान १ हजार आहे. दाऊद तर्फ या मालमत्तांची देखभाल त्याचे पित्ते करत असतात. फेरा खाली मुंबईतील दाऊदच्या ५० मालमत्ता आत्तापर्यंत पोलिसांनी जप्त केल्या असल्या तरी दक्षिण मुंबईतच दाऊदच्या किमान १०० मालमत्ता असल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने नव्याने दाऊदच्या मालमत्तांचा तपास करण्याचे काम सुरू केले असून अशा ३५० मालमत्तांचे चेकींग सुरू झाले आहे. १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर दाऊदने पाकिस्तानच्या कराचीत आपला तळ उभारला असल्याची माहिती सरकारकडे आहे मात्र जप्त केलेल्या त्याच्या मालमत्तांचा लिलाव सरकार करू शकलेले नाही कारण त्यात अनेक कायदेशीर अडचणी आहेत असेही सांगितले जात आहे.