दहशतवादाशी लढण्यात भारतीय सेना यशस्वी – अमेरिकी सेना प्रमुख

वॉशिग्टन दि.५ – दहशतवादाशी मुकाबला करण्यात भारतीय सेनेने मिळविलेले यश लक्षणीय असून अमेरिकी सेना भारतीय सेनेकडून याबाबत कांही शिकू शकते असे अमेरिकेचे सेना प्रमुख जनरल रे ऑर्डिआर्नो यांनी एका मुलाखतीत सांगितले. भारतीय सेनेच्या या यशामुळे आपण फार प्रभावित झालो आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सेनानी युद्धसराव करावा आणि तो जम्मू काश्मीर भागात करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले या संयुक्त सरावात आम्हाला भारतीय सेनेचा दहशतवादाविरोधात लढण्याच्या अनुभवाचा लाभ मिळू शकणार आहे तसेच आम्ही आत्तापर्यंत जे शिकलो त्यात सुधारणा करणे शक्य होणार आहे. भविष्याच्या दृष्टीने दोन्ही सेनांनी केलेली अनुभवांची देवाणघेवाण फार उपयुक्त ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

अतिशय कठीण परिस्थितीत आणि दुर्गम क्षेत्रात भारतीय सेना सातत्याने कार्यरत आहे आणि दहशतवाद्यांविरोधात चांगली कामगिरी बजावत आहे. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव खूपच मोठा असून तो अमेरिकी सेनेला समजणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या सीमेचे रक्षण भारतीय सेना कसे करते हेही आम्हाला जाणून घ्यायचे आहे असेही ते म्हणाले.यापूर्वी २००३ मध्ये भारतीय सेना आणि अमेरिकी सेनेने लडाख भागात संयुक्त युद्धसराव केला आहे.

Leave a Comment