आता मदरशांमध्ये शिकवावी लागणार भगवद् गीता

भोपाळ – मध्य प्रदेशात शिवराज यांच्या सरकारवर हिंदुत्व प्रसाराचे आरोप होत असतानाच सरकारच्या नव्या निर्णयामुळे वाद उठला आहे. यापुढे मध्य प्रदेशातील मदरशांमध्येही भगवद् गीता शिकवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

मध्य प्रदेशातील भाजप सरकारने इयत्ता 1 आणि इयत्ता 2 च्या विशिष्ट उर्दू आणि विशिष्ट् इंग्रजी पाठ्यपुस्तकांमध्ये गीतेमधील प्रसंग जोडण्याची अधिसूचना केली आहे. इयत्ता 3 ते इयत्ता 8 पर्यंत सामान्य हिंदीमध्ये गीतेमधील प्रसंग शिकवण्यात येतील. याबद्दल काही धार्मिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारच्या या निर्णयावर मध्य प्रदेशातील कॅथलिक काउंसिलचे प्रवक्ते फादर जॉनी पीजे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकारचा हा निर्णय धर्मनिरपेक्ष नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जर सरकारची नियत साफ असेल, तर सरकारने गीतेसोबतच कुराण आणि बायबलचेही पाठ अभ्यासात समाविष्ट करावेत. याबद्दल कोर्टात जाण्याची तयारी दर्शवत इसाई महासंघाचे संयोजक आनंद यांनी सरकारने धार्मिक गोष्टींपासून दूर राहावे, अशी सूचना केली आहे.

धर्म ही वैयक्तिक बाब असून त्यात सरकारने लक्ष घालू नये. इतर धर्मीय विद्यार्थ्यांना गीतेचे पाठ शिकवून सरकार अयोग्य परंपरा निर्माण करत असल्याचं आनंद यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment