मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार; संघाचा पाठिंबा

नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक सघाने ग्रीन सिग्नल दिला असल्याचे वृत्त असून भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही ’आम्ही आमचा उमेदवार निश्चित केला आहे, आता काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर करावा,’ असे सूचक आव्हान दिले आहे.

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत संघाचे वरिष्ठ सरचिटणीस भय्याजी जोशी, सहसरचिटणीस सुरेश सोनी, दत्तात्रय होसबोले आणि कृष्ण गोपाल हे पदाधिकारी उपस्थित होते. तर भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली हे वरिष्ठ नेते बैठकीत होते.

पंतप्रधानपदाच्या उमेदवार आता निश्चित केल्यास आगामी निवडणुकीत पक्ष वरचढ ठरेल असं मत संघाच्या पदाधिकार्‍यांनी मांडलं. त्यामुळे लवकरच औपचारीकता
म्हणून मोदींची भाजपच्या संसदीय मंडळावर निवड केली जाईल, असं सांगण्यात येतंय. मोदींच्या निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी झालेल्या निवडीला अडवाणींनी तीव्र विरोध केला होता आणि राजीनामा दिला होता.

त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह मोदींच्या उमेदवारीबाबत संसदीय मंडळातील सदस्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. प्रचार, जाहीर सभांचे नियोजन आणि त्यासाठी असणार्‍या समन्वयाच्या कामाला लागा अशा सूचना भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांना दिल्या आहेत. नायडू हे पक्षाच्या प्रचार आणि निवडणूक संबंधी असलेल्या कामकाज समितीचे प्रमुख आहेत.

तसंच प्रचारांच्या विविध माध्यमांमधून मोदींना जनतेसमोर मांडावं, असेही आदेश देण्यात आले आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत नेत्यांनी ध्यमांमध्ये वक्तव्य करू नये, असे आदेश राजनाथ सिंह यांनी दिल्याचे पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सांगितले.

Leave a Comment