बी.ए. पास

बॉलिवुडमध्ये व्यवसयीक चित्रपटांच्या भाऊगर्दीत आशय प्रधान चित्रपटांची निर्मिती फार कमी झालेली आहे. अलिकडच्या काळात अशा चित्रपटांची संख्या वाढत असली तरी त्यामध्ये स्टार असले तरच त्या चित्रपटांची चर्चा होते. इतर चित्रपटांना प्रेक्षक फारसे गांभिर्याने घेतात अशी परिस्थिती नाही. यामुळेच दिग्दर्शक अजय बहल यांनी नवोदितांना घेऊन तयार केलेला ‘बी.ए. पास’ कौतुकास्पद ठरतो.

बी.ए.पास ही मुकेश नावाच्या अनाथ मुलाची कथा आहे. त्याला दोन बहिणी असून त्या त्याच्यापेक्षा वयाने लहान आहेत. मात्र तो मुलगासुद्धा एवढा लहान आहे, की तो आपल्या बहिणींचे पालनपोषण करु शकत नाही. दोन्ही मुलींना दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजाने एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहावं लागतं. एकदा फोनवर आपल्या बहिणींशी बोलत असताना मुलाच्या लक्षात येतं, की त्याच्या बहिणींना सेक्स वर्कर बनवण्यात येणार आहे. त्या मुली ज्या हॉस्टेलमध्ये राहतात, तिथे सेक्स रॅकेट चालवलं जातंय. या घटनेनंतर त्या मुलाचं आयुष्य बदलून जातं. तो उदास होतो. आपल्या बहिणींना तेथून बाहेर काढण्यासाठी काही तरी करायला पाहिजे, या विचारात तो मुलगा असतो. यासाठी तो बरीच मेहनत करु लागतो. मात्र अडचण ही आहे, की तो मुलगा आपल्या बहिणींचा ज्यापासून बचाव करु इच्छितोय ते काम तो करत असलेल्या कामापासून मुळीच वेगळे नाहीये.

संवेदनशील विषयांची आपल्यासमाजात मोठी यादी आहे, त्या पैकी एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सेक्स. हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडायचा म्हणजे बोल्डनेस आलाच. बी.ए.पास हाच संवेदनशील विषय वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मांडतो. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेबरोबर शय्यासोबत करणं, ही टीनएज फँटसी असते. मात्र हीच फॅन्टसी जेंव्हा व्यवसायात रूपांतरीत होते तेंव्हा काय होउ शकते हे या चित्रपटातून अतिशय विचारपूर्वक मांडण्यात आले आहे. मुकेश सोबत घडलेल्या घटनेवरुन लक्षात येतं, की फक्त पुरूषच परस्त्री कडे त्या नजरेने बघत नाहीत तर स्त्रियाही आपली नैसर्गिक गरज भागविण्यासाठी परपुरूषाला जवळ करतात. चित्रपटाचा संवेदनशील विषय कुठेही बोल्डनेसच्या मध्यमातून सवंग होउ नये याची पुरेपुर काळजी अजय बहल यांनी घेतल्याने चित्रपट आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला आहे.

चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. प्रोमो बघून चित्रपटात काही बोल्ड सीन्स बघायला मिळतील या विचाराने हा चित्रपट बघायला जाल तर हाती निराशा येईल मात्र त्याच वेळी एका संवेदनशील विषयावरील उत्कृष्ट कलाकृती बघितल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल.

Leave a Comment