झिम्बाब्वेला भारताचा व्हाईटवॉश!

बुलावायो – भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या एक दिवसीय सामन्यातही विजयी तिरंगा फडकवला आहे. मालिकेतील शेवटच्या वन डेत भारताने झिम्बाब्वेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला आणि झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिला. परदेशी भूमीत भारताने 5-0 अशा फरकाने जिंकलेली ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे भारताने नवा इतिहास रचला आहे.
भारताकडून मुंबईकर अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर जाडेजाने नाबाद 48 आणि शिखर धवनने 41 धावा केल्या. त्यापूर्वी अमित मिश्राच्या भेदक फिरकीच्या जोरावर, भारताने झिम्बाब्वेला अवघ्या 163 धावांत गुंडाळलं होतं. मिश्राने सर्वाधिक सहा विकेट्स काढल्या. पाचवी आणि अंतिम लढत सात विकेट आणि 16 षटके राखून जिंकत भारताच्या यंग ब्रिगेड’ने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत शनिवारी 5-0 असे निर्भेळ यश मिळवले.

या विजयासह झिम्बाब्वेत तीन वर्षापूर्वीच्या पराभवाच्या कटू आठवणी पुसून काढण्यात भारताला यश आले. लेगस्पिनर अमित मिश्राची (सहा विकेट) प्रभावी गोलंदाजी तसेच अजिंक्य रहाणे (50) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाची (नाबाद 48) उपयुक्त फलंदाजी भारताच्या आणखी एका सफाईदार विजयाचे वैशिष्टय ठरले.

पहिल्याच षटकात चेतेश्वर पुजाराला गमवावे लागले तरी झिम्बाब्वेचे 164धावांचे आव्हान पार करायला भारताला 34 षटके पुरेशी ठरली. पाचव्या लढतीत
संधी मिळालेल्या अजिंक्यने शिखर धवन आणि रवींद्र जडेजासह दुस-या आणि तिस-या विकेटसाठी अनुक्रमे 55 आणि 71 धावांची भागीदारी करत भारताला विजयासमीप नेले. त्याच्यानंतर जडेजाने दिनेश कार्तिकसह चौथ्या विकेटसाठी नाबाद 41 धावा जोडताना 34व्या षटकात विजय साजरा केला. मुंबईकर’ अजिंक्यने तिसरे वनडे अर्धशतक ठोकताना चार चौकार आणि एक षटकार लगावला.

तत्पूर्वी, धवनने 28 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 41 तसेच जडेजाने चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद 48 धावांचे योगदान दिले. मात्र जमानांच्या सहा फलंदाजांना बाद करणारा मिश्रा सामनावीर ठरला. लेगस्पिनर अमित मिश्राच्या (सहा विकेट) प्रभावी गोलंदाजीपुढे फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने यजमानांचा डाव 39.5 षटकांत 163 धावांत आटोपला.

सलग तिस-या लढतीत झिम्बाब्वेला आपल्या वाटयाची षटके खेळून काढता आली नाहीत. त्यांच्यातर्फे मधल्या फळीतील सीन विल्यम्सने (51) खेळपट्टीवर बण्याचे धाडस दाखवले. पाचव्या वनडेसाठी भारताने दोन बदल केले. अंबाती रायडू आणि रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनला अंतिम संघात स्थान देण्यात आले. मात्र ऑफस्पिनर परवेझ रसूलला संधी दिली गेली नाही.

या मालिकेसाठी निवडला जाऊनही एकही सामना न खेळलेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे. रसूलला संघाबाहेर ठेवल्याबद्दल जम्मू आणि काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तीव्र नाराजी व्यक्त केली. झिम्बाब्वेने मात्र शेवटच्या लढतीसाठी चार बदल केले. प्रॉस्पर उत्सेया, सिकंदर रझा, मायकेल चिनोया आणि तेंडाइ चटाराच्या जागी काइल जार्विस, टिमीसेन मरुमा, नॅट्साइ शांग्वे आणि टिनोटेंडा मुटोंबोड्झीला संधी मिळाली.

Leave a Comment