उत्तर प्रदेशातल्या गौतमबुद्ध नगर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाचा परिणाम आता राष्ट्रीय राजकारणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समाजवादी पार्टीच्या सरकारने केलेल्या या निलंबनाला सोनिया गांधी यांनी विरोध केला असल्याने समाजवादी पार्टीचे नेते चिडले असून त्यांनी सोनिया गांधी यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध करण्याचे ठरवले आहे. तसे झाल्यास केन्द्रातल्या सरकारच्या बहुमतावर विपरीत परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुर्गा प्रकरण: वड्याचे तेल वांग्यावर
सोनिया गांधी यांनी दुर्गाशक्ती नागपाल यांना पाठींबा दिला असून पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून नागपाल यांचे निलंबन रद्द करावे असा आदेश दिला आहे. या पत्राने समाजवादी पार्टीचे नेते नाराज झाले असून त्यांनी या संदर्भात सोनिया गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. सोनिया गांधी या नागपाल यांना दबाव विरहित काम करता यावे असा युक्तिवाद करीत आहेत पण प्रत्यक्षात त्यांच्या जावयाच्या बेकायदा मालमत्तेची चौकशी करणार्या अशोक खेमका या आय.ए.एस. अधिकार्याला हरियाणातल्या कॉंग्रेसच्या सरकारने त्रास दिला असल्याचे समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी दाखवून दिले आहे.
या मुद्यावरून कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्या नेत्यांत शाब्दिक चकमक जारी आहे. कारण हरियाणातल्या अशोक खेमका यांची तिथल्या कॉंग्रेस सरकारने २२ वर्षात ४४ वेळा बदली केली आहे. समाजवादी पार्टीने केन्द्रातल्या सरकारला बाहेरून पाठींबा दिलेला आहे. मुलायमसिंग यादव यांच्यावर सीबीआयच्या चौकशीचे अस्त्र सोडण्यात आले असल्याने मुलायमसिेंग यादव नाईलाजाने कॉंग्रेसला पाठींबा देत होते. आता सीबीआयने त्यांना चौकशीतून क्लीन चिट दिली आहे. त्यांनी अन्न सुरक्षा विधेेयकाला पाठींबा द्यावा या अटीवर ही क्लीन चिट दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता ती मिळताच मुलायमसिंग कॉंग्रेसवर उलटणार असल्याचे दिसून येत आहे.