सोनमचीही होणार हॉलीवूडमध्ये एंट्री

काही वर्षांपूर्वी अभिनेता अनिल कपूरची कारकीर्द जवळपास संपुष्टात येण्याच्या उंबरठय़ावर पोहोचली होती. नेमकी या दरम्यान त्याला हॉलीवूडची एक ऑफर मिळाली व त्याचे आयुष्यच पालटले. अनिल कपूरनंतर बहुधा त्याची लेक सोनम कपूरच्या आयुष्यातही आता असेच होणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय फॅशन शोंना हजेरी लावणारी आणि लग्झरी ब्रँड्सच्या जाहिराती केल्यानंतर सोनम लवकरच हॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. तिथली भूमिका भलेही किरकोळ का असेना, ही संधी दवडण्याची तिची अजिबात इच्छा नाही.

‘रांझणा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे सध्या प्रचंड खूश असलेल्या सोनमने अलीकडेच हॉलीवूडच्या एका बड्या चित्रपटासाठी ऑडिशन दिले आहे. तिथे तिची निवड झाली तर पायरेट्स ऑफ कॅरेबियन मालिकेतील पाचव्या चित्रपटात जॉनी डेपसोबत ती दिसेल. या चित्रपटाच्या निर्मात्याने एका कंपनीला भारतीय चेहर्‍याचा शोध घेण्यासाठी भारतात पाठविले होते. कंपनीने अनिल कपूरसोबत या बाबत चर्चा केली, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सोनमचे नाव सुचविले. त्यानंतर गेल्याच आठवड्यात मुंबईत सोनमचे ऑडिशन घेण्यात आले. सोनमच्या मैत्रिणीच्या माहितीनुसार, ऑडिशनच्या वेळी सोनमने केलेले काम सगळ्य़ांनाच पसंत पडले. अर्थात अजून निकाल कळायचा असून त्याची ती आतुरतेने वाट पाहत आहे. असेही समजते की, हॉलीवूडच्या निर्मात्याने तिच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली आहे.

या चित्रपटाच्या चित्रणाला २0१५मध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यात सोनमची भूमिका किती दमदार आहे, हे आताच सांगणे कठीण आहे. अर्थात त्या आधी तिची निवड होते की नाही, हे सगळ्य़ात महत्त्वाचे आहे.

Leave a Comment