भ्रष्टाचार कमी करण्यासाठी राजकिय पक्षांचे प्रयत्न नाही – अ‍ॅड.रामजेठमलानी

पुणे, – गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराचे मोठे घोटाळे बाहेर येत आहेत. हे भ्ररष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्य त्या प्रमाणात प्रयत्न होत नाही, असे मत ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील विधी, अर्थशास्त्र, संगणक शिक्षण व संशोधन आदी विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सिंबायोसिस संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रभारी कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, रिलायन्स इनोव्हेशन लिडरशीप सेंटरचे डॉ. अरविंद चिंचुरे, डॉ. शशीकला गुरपूर, ललित कथपलिया, ज्योती चंद्रिरमनी आदी उपस्थित होते.

यावेळी जेठमलानी म्हणाले की, शिक्षणाशिवाय लोकशाही टिकणार नाही. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला उच्च शिक्षण मिळाले पाहिजे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. देशातील काही शाळांमध्ये इमारती, आवश्यक शिक्षक नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही, असे चित्र पाहावयास मिळत आहे. त्या बदल होणे आवश्यक आहे. सध्या देशाला सहिष्णू, प्रेमळ, धैर्यवान युवकांची आवश्यकता आहे. या युवकांमुळेच वैभवशाली देश निर्माण होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. देशातील भ‘ष्टाचाराचे अनेक घोटाळे बाहेर येत आहेत. तसेच देशाबाहेर काळा पैसा घेऊन गेले आहेत, त्यांची नावे जाहीर होऊ नयेत, यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षा दोघेही प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत देशाला नवा भारतीय समाज घडविणार्‍या नेतृत्वगुण संपन्न शिल्पकाराची गरज असल्याचे जेठमलानी यांनी सांगितले.
============