जगभरातील सर्व देशांवर हेरगिरी करणारा वादग्रस्त ठरलेल्या अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनएसए) च्या प्रिझम कार्यक्रमातील एक सर्व्हर भारताची राजधानी दिल्लीजवळ बसविला गेल्याचे गार्डियनने दिलेल्या वृत्तात म्हटले गेले आहे. याच संस्थेच्या या गुप्त कार्यक्रमाचे गुपित फोडणार्या व सध्या रशियात ताप्तुरता आश्रय मिळालेल्या एडवर्ड स्नोडेन याने गार्डियनला दिलेल्या कागदपत्रांतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
स्नोडेनने गार्डियनला जी गुप्त कागदपत्रे पुरविली आहेत त्यानुसार जगभरातील इंटरनेट युजर डेटा गोळा करून त्यातील प्रत्येक इमेल.चॅट, नेट सर्फिगवर नजर ठेवण्यासाठी एनएसएने असे 700 सर्व्हर जगभरात 150 विविध ठिकाणांवर बसविले आहेत. त्यातील एक सर्व्हर भारतातही आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून ही संस्था एक्स की स्कोअर प्रोग्रॅमच्या सहाय्याने जगात कुठेही जो माणूस ईमल, ऑनलाइन चॅट, काय ब्राऊजिंग करतो यावर लक्ष ठेवून असते.
एडवर्ड स्नोडेनच्या सांगण्याप्रमाणे फेब्रुवारी 2008 पासून हा कार्यक्रम राबविला जात असून त्याला प्रिझम प्रोग्रॅम असे नांव दिले गेले आहे.एक्स की स्कोअर कार्यक्रमाच्या प्रशिक्षण सादरीकरणातच असा दावा केला गेला होता की इंटरनेट युजर अथवा मोबाईल युजर काय काय करतात त्या प्रत्येक हालचालीवर याच्या मार्फत नजर ठेवली जाऊ शकते. युजरनी कोणाला मेल केल्या, कोणत्या साईट पाहिल्या, काय सर्च केले हेही त्यामुळे समजू शकते.
भारतात आयबीएम, एचपी, डेल या अमेरिकन कंपन्या सर्व्हर मार्केटमध्ये अग्रणी आहेत.कोणतीच भारतीय कंपनी संगणक, इलेक्ट्रॉनिक्स चीप्स अथवा सर्व्हरसाठी लागणारी की कंपोनंटस बनवित नाही असेही मार्केट रिसर्च अॅनालिस्ट फर्म आयडीसी च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
भारतातही अमेरिकन कंपनीचा एक सर्व्हर असल्याचा वृत्ताचा इन्कार राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने केला असून गार्डियनने प्रसिद्ध केलेला अहवाल दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचा हा कार्यक्रम दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राबविला जात असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले आहे.