ढाका – बांगलादेशातील जमात-ए- इस्लामी या उजव्या विचारसरणीचा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली असून, भविष्यात कोणत्याही निवडणुका लढविण्यास या पक्षाला न्यायालयाने आज बंदी घातली. त्यामुळे या पक्षाचे राजकीय भवितव्यच धोक्यात आले आहे. न्यायाधीश एम. मुअज्जम हुसेन, एम. इनायतूर रहीम आणि काझी रझा-उल-हक यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
बांगलादेशात जमात-ए- इस्लामीवर बंदी
जमात-ए- इस्लामी या पक्षाची राजकीय पक्ष म्हणून करण्यात आलेल्या नोंदणीला आव्हान देणार्या याचिकेवरील सुनावणी आज न्यायालयात झाली. बांगलादेश तारीकियत फेडरेशनचे सरचिटणीस रेझूल हक चांदपुरी आणि अन्य 24 जणांनी ही याचिका दाखल केली होती. जमात-ए- इस्लामी हा धार्मिक आधारावर चालणारा पक्ष असून, तो बांगलादेशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमता यावर विश्वास ठेवत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
जमात-ए- इस्लामी या पक्षावर बंदी घालण्याची मागणी बांगलादेशमध्ये जोर धरत असल्याचा पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामा वेळी 1971 मध्ये घडलेल्या युद्ध गुन्ह्यांना जमात-ए- इस्लामी हा पक्ष जबाबदार असल्याने, त्यावर बंदी आणावी, अशी ही जनतेकडून मागणी होत होती. मुक्ती संग्रामाच्या काळात अत्याचार घडविल्याच्या गुन्ह्याखाली पक्षाचे प्रमुख गुलाम आजम यांच्यासह अन्य काही वरिष्ठ नेत्यांना न्यायालयाने मृत्युदंड व जन्मठेपेची शिक्षा नुकतीच सुनावली आहे.