मास्को – रशियात अडकून पडलेल्या एडवर्ड स्नोडेनच्या वडिलांनी म्हणजे लॉन स्नोडेन यांनी रशियाच्या रोसिया दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एडवर्डला रशियाने संरक्षण दिल्याबद्ल अध्यक्ष पुतीन आणि रशियन सरकारला धन्यवाद दिले आहेत. स्नोडेनचे वडील अमेरिकेतील पॅनसिल्व्हीयामधील अॅलनटाऊन येथे वास्तव्यास असून वरील चॅनलने त्यांना रशिया भेटीचे आमंत्रण दिले असल्याचेही समजते.
या मुलाखतीत लॉन यांनी स्नोडेनला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखविलेल्या धैर्याबद्दल क्रेमलिनचेही आभार मानले आहेत. एडवर्डला याच मुलाखतीतून उद्देशून ते म्हणतात , आम्ही चांगले आहोत आणि आमचे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लवकरच भेटू अशी आशा आहे मात्र सर्वात पहिले प्राधान्य तू सुरक्षित असण्यास आहे. तुला अन्य देशांनी आश्रय देण्याचे मान्य केले असले तरी तेथून बाहेर पडताना येणार्या अडचणी लक्षात घेऊन तू रशियातच राहावेस असे आम्हाला वाटते.
लॉन यांनी आपल्याला मुलाचा अभिमान वाटतो कारण त्याने अखिल मानवी स्वातंत्र्यासाठी आणि त्यांची प्रायव्हसी अबाधित राहावी यासाठी लढा दिला आहे. अशा प्रसंगात वैयक्तीक त्याग करावा लागतो आणि तो करण्याचे शौर्य त्याने दाखविले आहे.
स्नोडेन २३ जूनपासून मास्को विमानतळाच्या ट्रांझिट झोनमध्ये थांबला आहे. रशिया त्याला ताप्तुरता आश्रय देण्याच्या विचारात असून त्यासाठी आवश्यक अर्ज जुलैच्या १६ तारखेला स्नोडेनचे रशियन वकील अॅटोली कुचेरेना यांनी संबंधितांकडे दाखल केला आहे. स्नोडेनला अमेरिकेची गुपिते यापुढे लीक करणार नाही या अटीवर आश्रय देण्याचे रशियाने कबूल केले असले तरी यापूर्वीच त्याने जी कागदपत्रे वर्तमानपत्रांना दिली आहेत, ती प्रसिद्ध होणे थांबविता येणे शक्य नसल्याचेही वकीलांचे म्हणणे आहे.