सुलभ वाहतूक उपलब्ध करून दिली तरच मोटारींना पर्याय उपलब्ध: डॉ श्रीधरन्

पुणे, -ˆज्या लोकाना स्वत:च्या मोटारीने प्रवास करावा लागतो, अशांना जर चांगले प्रवाससाधन उपलब्ध करून दिले तरच रस्त्यावरील मोटारींची गर्दी कमी होईल , याहेतूने मेट्रोची रचना करण्यात आली आणि प्रत्येक प्रवाशाचा अर्धा तास वाचेल, अशा पद्धतीने दररोज पंचवीस लाख लोकांची वाहतूक आम्ही करत आहोत, असे कोकण रेल्वे व दिल्लीमेट्रोचे निर्माते डॉ ई श्रीधरन यांनी पुण्यात लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार स्वीकारताना सांगितले. डॉ श्रीधरन यांना एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात मेट्रो सुरु होण्याची गरज आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले.

प्रारंभी प्रास्ताविक करताना टिळक स्मारक मंदिराचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक म्हणाले, पनवेल ते रत्नागिरी असा रेल्वेमार्ग झाला पाहिजे, अशी लेखी मागणी लोकमान्य टिळक यांनी सन 1887 मध्ये त्यावेळच्या विधीमंडळात केली होती, ती कोकण रेल्वे बरोबर शंभर वर्षानी सन 1987 मध्ये त्याला अंशत: आरंभ झाला, केवळ डॉ ई श्रीधरन् यांनी हा विषय हाताळल्याने हे घडू शकले. डॉ श्रीधरन हे रेल्वेनिर्मितीत चमत्कार घडवणारे अधिकारी आहेत, दिल्ली मेट्रो प्रकल्प त्यांनी वेळे आधी पस्तीस महिने पूर्ण केला, त्यातून रोज पंचवीस लाख लोक प्रवास करतात, प्रत्येकाचे सुमारे 28 निमिटे वाचतात, त्यामुळे रस्त्यावर येणारी दहा लाख वाहने रस्त्यापासून दूर राहतात. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित राहाते.’

लोकमान्य सम्मान पुरस्काराचे हे एकतिसावे वर्ष होते. पुरस्कार एक लाख रुपयांचा असून त्याचा विनियोग आपण चार गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी डॉ श्रीधरन् यांच्या पत्नी सौ. राधा याही उपस्थित होत्या. श्रीधरन् आपल्या भाषणात म्हणाले, गतिमानता हा काळचा परवलीचा शब्द झाला आहे त्यामुळे मोठमोठे रस्ते व मोठी वाहने असतानाही दहा ते पन्नास किमी अंतर काही मिनिटात पार करणे ही आता काळाची गरज आहे. दिल्लीमेट्रोमध्ये दररोज चार डब्याच्या तीन हजार गाड्या पळतात व त्यातही महत्वाचे म्हणजे वेळ पाळण्यासाठी आम्ही 99पूर्णांक 97 शतांश टक्के अचूकता दाखवतो. त्यामुळे आपल्या घरातील अलिशान गाडीला पर्याय म्हणून लोक मेट्रोची निवड करतात. प्रत्येक ट्रिप ही क्लॉक ऐवजी रिव्हर्स क्लॉकवरच चालते त्यामुळे एका एका सेकंदानें वेळापत्रक पाळले जाते. त्यामुळे जगातील सर्व मेट्रोमध्ये ती आदर्श ठरली आहे.’ डॉ श्रीधरन् यांचे सारे भाषण पुण्याची मेट्रो लवकरात लवकर सुरु करा, अशा आशयाचे होते.

माजी आमदार उल्हास पवार यांनी आपल्या भाषणात,‘ दिल्लीत नव्याने झालेल्या महाराष्ट्र सदनात शिवाजी महाराज, म.फुले, छ.शाहू महाराज, डॉ आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे आहेत पण लोकमान्य टिळक यांचा पुतळा नाही, तो ते लवकरात लवकर बसवला जावा. रोहित ठिळक यांनी प्रारंभी स्वागत केले. केसरीचे श्री स्वप्नील पोरे यांनी आभार मानले.
.——————.
छायाचित्रातˆ टिळक स्मारक मंदिराचे प्रमुख विश्वस्त डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार स्वीकारताना मेट्रोमॅन डॉ श्रीधरन् . शेजारी सौ राधा श्रीधरन व डाव्या बाजूस डॉ रोहीत टिळक