शोभा डे यांचा उद्योग : आ बैल मुझे मार

मुंबई – स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर देशात काही नव्या राज्यांच्या मागणीला जोर आला. परंतु ज्या राज्यांची मागणी आजवर प्रलंबित होती त्या राज्यांच्याच मागणीने जोर धरला. पण मुंबईच्या, इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभलेखन करणार्‍या लेखिका शोभा डे यांना काय अवदसा आठवली हे माहीत नाही, पण त्यांनी काही कारण नसताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी का केली जात नाही, असा प्रश्‍न केला. त्यांनी आपल्या ट्विटरवर हा उपद्व्याप केला आणि टीकेचे मोहळ उठवले. त्याच्या माशा डसल्यामुळे आता शोभा डे यांच्यावर हाय हाय करण्याची पाळी आली आहे.

शोभा डे या मुळात महाराष्ट्रीयन आहेत. त्यांना तरी निदान मुंबई वेगळी व्हावी असे वाटण्याचे काही कारण नाही. परंतु त्यांनी मुंबईने आपले वैशिष्ट्य टिकवले असल्यामुळे तिला महाराष्ट्रापासून वेगळे करावे असे आपल्या ट्विटरवर म्हटले. अशा प्रकारे मुंबई वेगळी करणे हा विषय तसा राजकारणी लोकांचा आहे. राजकारणात कसलेच स्थान नसलेल्या शोभा डे यांनी अशा प्रकारची भावना व्यक्त करावी हा सरळसरळ वेडेपणा आहे खरा, पण त्यांच्या या म्हणण्याला किती महत्व द्यावे याला काही प्रमाण आहे की नाही? असा प्रश्‍न कोणाच्याही मनात निर्माण व्हावा इतकी त्यांच्यावर जहाल आणि अतिरेकी टीका करण्यात आली.

राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी त्यांचा निषेध केला. मनसेने नेहमीप्रमाणेच त्याचे टोक गाठत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ दिला आणि मुंबई वेगळी करणे हे घटस्ङ्गोट घेण्याइतके सोपे नाही, असा उल्लेख केला. शिवसेनेने तर त्यांना अटक करण्याची मागणी केली. या निमित्ताने आपले मुंबईवरचे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली हे खरे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर शोभा डे यांचा मेंदू डोक्याच्या बाहेर आहे का, असा प्रश्‍न विचारला. त्यामुळे राजकारणातला सौम्यपणा संपत आला आहे का, असा प्रश्‍न विचारावासा वाटतो.

मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ज्यांनी मोठे आंदोलन उभे केले अशा जुन्या पिढीतल्या नेत्यांच्या समोर मुंबई वेगळी करण्याचा हा प्रस्ताव आला असता तर त्यांनी आपली प्रतिक्रिया अशा असभ्य शब्दात व्यक्त केली असती का? विशेषत: एका स्त्रीच्या विरोधात बोलताना ते एवढी पातळी सोडून बोलले असते का? असे वाटल्यावाचून रहात नाही.

Leave a Comment