नाट्य संमेलनाच्या निमंत्रणांवरून नवे नाट्य

पुणे : साहित्य संमेलनाच्या निमंत्रणावर पडदा पडतो तोच नाट्य संमेलनाच्या निमंत्रणांवरून नवे नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. आगामी नाट्य संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणे स्वीकारणार की, नवी निमंत्रणे मागवणार यावरून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या नियोजित बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. जुनी निमंत्रणे ग्राह्य धरली नसल्याचे परिषदेच्या पदाधिकारी सदस्यानी स्पष्ट केले असतानाच, नियोजित बैठकीसाठी सदस्यांना पाठविलेल्या कार्यक्रम पत्रिकेत जुन्या निमंत्रणांवर चर्चा होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या परस्परविरोधी भूमिकांमुळे बैठक गाजण्याची शक्यता आहे.

आगामी नाट्य संमेलन कुठे होणार याबाबत नाट्य वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. गतवर्षी बारामती येथे झालेल्या संमेलनाच्यावेळी पुढील संमेलनासाठी काही निमंत्रणे आली होती. यापैकी एका निमंत्रणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच असे काहीही होणार नसल्याचे परिषदेतर्फे स्पष्ट झाले आहे. याविषयी बोलताना परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर म्हणाले, यापुर्वी आलेली निमंत्रणे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. काही दिवसांत नवी निमंत्रणे मागविण्यात येतील.

नोव्हेंबरमध्ये नियामक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे येत्या ४ आॅगस्टला पिंपरी येथे बैठकीत यावर कोणतीही चर्चा होणार नाही. या बैठकीत नियमित विषयच असतील. या भूमिकेवर काही सदस्यांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये निमंत्रणांवर चर्चा आणि निर्णय असे म्हटले आहे. मग जर चर्चा होणारच नसेल तर कार्यक्रमपत्रिकेत हा विषय का घेतला? मुळात यापूर्वी आलेली निमंत्रणे अशी बाद करता येत नाहीत. त्यातूनच संमेलनस्थळावर निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे या सदस्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment