चीनमध्ये सुद्धा राशींचा प्रभाव

बीजिंग – चीनने आपल्या हुकूमशाही राज्य पद्धतीमध्ये माहितीच्या देवाणघेवाणीवर बरेच निर्बंध लादले असले तरी चीनच्या सरकारला जगाच्या इतर भागातून येणार्‍या ज्योतिष शास्त्राच्या प्रभावापासून देशाचा बचाव करता आलेला नाही. भारतीय आणि पाश्‍चिमात्य माध्यमांच्या आक्रमणामुळे चीनमध्ये सार्वजनिक व्यवहारात जन्म राशींचे महत्व वाढत चालले आहे. चीनमधल्या काही संस्थांनी आणि उद्योगांनी नोकर भरती करताना शिक्षण, वय, कौशल्य या बरोबरच जन्मरास हाही एक निकष मानायला सुरुवात केली आहे.

मुलाखतीला आलेल्या उमेदवाराला स्वत:चा परिचय करून देताना शिक्षण, कामाचा अनुभव या बरोबरच आपली जन्मरास कोणती हे सांगावे लागत आहे. चीनच्या लियाओनिंग प्रांतातल्या एका ट्रॅव्हल एजन्सीने नोकर भरतीची जाहिरात करताना, कुंभ, तूळ आणि मिथून या राशींच्या व्यक्तींनीच अर्ज करावा असे प्रसिद्ध केले आहे. बंदाओ मॉर्निंग न्यूज या वृत्तपत्राने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. चीनमधल्या शू जिंगपिन या तरुणाने आपला अनुभव प्रसिद्ध केला असून त्यातही अशी माहिती दिली आहे. आपल्याला एका कंपनीमध्ये मुलाखतीसाठी बोलावले होते, परंतु नियुक्तीसाठीच्या सर्व अटी पूर्ण करूनही आपल्याला नोकरी मिळू शकलेली नाही कारण आपली रास त्या संस्थेच्या अटीत बसत नव्हती असे त्याने म्हटले आहे.

चीनमध्ये असा प्रकार घडत असला तरी त्या विरुद्ध सुद्धा काही लोकांनी आवाज उठवला आहे. हॉंगकॉंग मधील साऊथ चीन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राचे संपादक एमी ली यांनी या रासभेदाविरुद्ध आवाज उठवला आहे. इंटरनेटवर सुद्धा यावर वाद होत आहेत. काही ब्लॉगर्सनी राशींचे समर्थन केले आहे तर काही राशींच्या विरोधात लिखाण करत आहेत.