लंडन – जगभरातच स्मार्टफोनचा वाढत चाललेला वापर आणि या तंत्रज्ञानाला असलेली प्रचंड मागणी पाहून बँकींग क्षेत्रानेही आता या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे. ब्रिटनमध्ये ८० टक्के लोक एटीएमचा वापर करतात हे लक्षात घेऊन येत्या पाच वर्षात तेथे अत्याधुनिक एटीएम बसविण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या एटीएम इंडस्ट्री असोसिएशनच्या जागतिक परिषदेत घेतला गेला आहे. त्यानुसार भविष्यात स्मार्टफोनच्या सहाय्याने ऑपरेट होणारी टन स्क्रीन असलेली अत्याधुनिक एटीएम मशीन्स वापरात येणार आहेत.
स्मार्टफोन तंत्रज्ञानावर चालणार्या काही एटीएम मशीन्सचे प्रात्यक्षिकही या परिषदेत सादर केले गेले. सिक्युरिटी अॅन्ड सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी डायबोल्टने टॅब्लॅट पीसीच्या तंत्रज्ञानावर आधारित अधुनिक एटीएम मशीनची निर्मिती केली आहे.युनिक आयडेंटिफिकेशन नंबर द्नारा ग्राहक हे मशीन हाताळू शकणार असून ते ब्रॅाडबँडवरही चालविता येणार आहे. त्यामुळे पैसे काढण्याबरोबरच अन्य अनेक कामांसाठीही ग्राहक याचा वापर करू शकणार आहेत.
एनसीआर कंपनीने बनविलेले मशीन आयपॅड सारखे असून त्यात युजर कॅशिअरशी व्हिडीओ माध्यमातून संवादही साधू शकणार आहे. इतकेच नव्हे तर अपंगांसाठी हे मशीन खाली वाकू शकेल अशी या मशीनची रचना केली गेली आहे. सर्व ब्रिटनभर अशी मशीन्स येत्या पाच वर्षात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.