पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदीच – सप्टेंबरमध्ये घोषणा

नवी दिल्ली दि.१ – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सप्टेंबरमध्ये करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्टार व्होट कॅचर असलेल्या मोदींची लोकप्रियता आगामी चार बड्या राज्यातील विधानसभा निवडणुकांतही कॅश करण्याचा पक्षाचा प्रयत्न असून त्यामुळेच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची घोषणा सप्टेंबरमध्ये केली जाईल असे सांगितले जात आहे.

दिल्लीतील वरीष्ठ भाजप नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे अध्यक्ष राजनाथसिग आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे अध्यादेश काढण्याअगोदर मोदींच्या नावाची घोषणा करण्यासंबंधी भागवत आणि राजनाथसिग यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. याच बैठकीत भाजपच्या निवडणूक ब्लूप्रिंट वर अखेरचा हातही फिरविला जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणूका मे २०१४ मध्ये होतील असे सांगितले जात आहे. मात्र त्या अलिकडे आल्या तरी फेब्रुवारीच्या आत होणार नाहीत असा अंदाज वर्तविला जात आहे. मोदींना पक्षाचा अधिकृत चेहरा म्हणून लोकांसमोर आणून त्यांना त्याचा प्रचारासाठी फायदा व्हायचा तर किमान सहा महिन्यांचा अवधी त्यांना मिळाला पाहिजे असे सल्लागारांचे मत आहे. त्यामुळेच मोदींच्या नावाची घोषणा सप्टेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत केली जाईल असे सांगितले जात आहे.

संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी फार महत्त्वाची भूमिका या निवडणक स्ट्रॅटिजीसाठी बजावली आहे. गेल्या कांही आठवड्यांत त्यांनी अनेक भाजप वरीष्ठ नेत्यांशी सातत्याने बैठका केल्या आहेत. नाराज आडवानींनाही समजूत काढून त्याची मोदी विरोधी भूमिका बदलण्यास डॉ. भागवत यांनी भाग पाडले आहे तसेच मोदींशीही चर्चा करून निवडणुक प्रचारात कोणते मुद्दे अधिक मांडले जावेत याविषयी चर्चा केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून भाजपने निवडणक कार्यक्रमांसाठी टीम मोदी निवड केली आहे.

Leave a Comment