तेलंगणात माओवादी चळवळ वाढण्याची शक्यता

हैदराबाद : आंध्र प्रदेशातून तेलंगण वेगळा केल्यामुळे तेलंगणातली माओवाद्यांची चळवळ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुळात आंध्र प्रदेशात नक्षलवादी होते ते तेलंगणातलेच होते. स्वातंत्र्यापूर्वी तेलंगणातील जमिनदारांच्या अत्याचाराविरोधात कम्युनिष्टांनी उभी केलेली शेतमजूरांची आणि सामान्य शेतकर्‍यांची चळवळच पुढे नक्षलवादी चळवळ म्हणून सुरू राहिली. एकत्रित आंध्रातल्या काही जिल्ह्यात तिचे लोण पसरले असले तरी ती प्रामुख्याने तेलंगणातच केंद्रीत झालेली राहिली. आता तेलंगण राज्य निर्माण होताना या चळवळीने राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या संघटनांना पाठिंबा दिला. त्यामुळे तेलंगणातल्या यानंतर सत्तेवर येणार्‍या पक्षाला नक्षलवाद्यांच्या बाबतीत सौम्य धोरणे स्वीकारावी लागणार आहेत.

यापूर्वी तेलंगणातील नक्षलवादी चळवळ आटोक्यात आणली गेली असली तरी त्या कामात पूर्ण आंध्र प्रदेशातील पोलीस आणि सुरक्षा दले यांची मदत झाली आहे. आता मात्र या कामासाठी केवळ तेलंगणातील मर्यादित पोलिसांचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे काम अवघड होऊन बसणार आहे. आता राज्याच्या विभाजनाची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ बनलेले ग्रेहाऊंडस् हे विशेष पोलीस दल आंध्राच्या वाट्याला जाते की तेलंगणाच्या वाट्याला येते याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हे दल आंध्राच्या वाट्याला गेल्यास तेलंगणातील नक्षलवाद विरोधी मोहीम अवघड होणार आहे. कारण ग्रेहाऊंडस् हे दल केवळ नक्षलवाद्यांच्या विरोधात तयार करण्यात आले होते आणि त्याला जंगलातील लढाईचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

बिहारचे विभाजन करून झारखंड वेगळा केला. मध्य प्रदेशाचे विभाजन करून छत्तीसगड हे नवे राज्य निर्माण करण्यात आले. अखंडित राज्यात असताना हे दोन्ही भाग नक्षलवाद ग्रस्त म्हणून ओळखले जात होते आणि राज्यांचे विभाजन होऊन त्यांचे स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात आली तेव्हा त्या राज्यातील नक्षलवादी किंवा माओवादी चळवळ अधिक तीव्र झाली आहे. तसाच प्रकार तेलंगणाच्या बाबतीत होईल असा तज्ज्ञांचा कयास आहे.

Leave a Comment