केजरीवालांच्या आम आदमीला मिळाला झाडू

नवी दिल्ली ,1 – देशातील भ‘ष्टाचार आणि ढिसाळ प्रशासनाविरोधात लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने झाडू हे निवडणूक चिन्ह प्रदान केले आहे.त्यामुळे आगामी दिल्ली विधानसभा निवडणूकात पक्षाचे सर्व 70 उमेदवार याच चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या चिन्हाबद्दल पक्षाने आनंद व्यक्त केला आहे. पक्षाची अधिकृत राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केल्यानंतर निवडणूक चिन्ह मिळविण्यात यश आल्याने पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. देशाच्या राजकारणात माजलेली जळमटे,भ्रष्टाचाराचा धुरळा झाडून काढण्यासाठी आणि देशातील राजकारण साफ करण्यासाठी हे चिन्ह अतिशय योग्य असल्याचे मत पक्षाने व्यक्त केले आहे.

केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार झाडू हे कष्टाचे प्रतीक आहे तसेच ते स्वच्छतेचे प्रतीकही आहे. कष्टाला झाडूमुळे प्रतिष्ठा मिळते. सध्याच्या सरकारने आणि राज्य सरकारने जमा केलेला राडारोडा आणि कचरा साफ करण्याच्या उद्देशाने निवडणूक रिंगणात उतरलो आहेात. देशाला अशा क्लिन स्वीपची गरज आहे. आम आदमी पक्षाची स्थापना डिसेंबरमध्ये करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणीसाठी सर्व कागदपत्रे दाखल केली होती. मार्चमध्ये निवडणूक आयोगाने आम आदमीला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली असेही ते म्हणाले. पक्षाला मिळालेल्या या अधिकृत निवडणूक चिन्हाचे उद्घाटन 3 ऑगस्ट रोजी होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमात केले जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment