विक्रमी पावसाची दखल घ्यायला शिकूया: डॉ रामचंद्र साबळे

पुणे, : गेल्या सात आठ वर्षाच्या पावसाचे स्वरुप बघितले तर त्याकडे केवळ शेतीच्या दृष्टीकोनातून बघून चालणार नाही, उत्तराखंड, कोकण आणि सध्या विदर्भ येथे पडत असलेल्या पावसाचे स्वरुप इतके उग्र आहे की, त्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा तर संबंध येतोच पण आपापले नुकसान टाळण्यासाठी प्रत्येकाने दररोज हवामानाचा अंदाज बघितलाच पाहिजे व त्याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे, असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे मान्सूनहवामानाचा अचूक अंदाज देणारे शास्त्रज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात यंदा जादा पाउस आहे. तीन चार जिल्ह्यात फक्त सरासरीयेवढा पाउस आहे. पण त्याही पेक्षा गंभीर दखल घ्यावी लागणार असल्याची घटना म्हणजे एकाच ठिकाणी जादा पाउस पडण्याचे प्रकार जादा घडत आहेत. महाराष्ट्रात विदर्भ व कोकण येथे सध्या प्रलयसदृश स्थिती आहे आणि त्याची सुुरुवात पुण्यापासून झाली, असेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या पावसाचे यावर्षीचे वैशिष्ठ्य सांगताना ते म्हणाले, दरवर्षी पुण्याला दि.9 जून रोजी पाउस येतो. यंदा तो सहा दिवस लवकर आला आणि पुण्याचा जोराचा धक्का दिला.सर्वांना कात्रजपरिसरात झालेल्या एक कडाच्या कडा वाहून गेल्याचा प्रसंग आठवत असेल.पहिल्याच पावसात अनेक गाड्या, माणसे आणि डोंगराचा एक कडाच वाहून गेला,त्यामुळे पुण्यातील बेकायदा बांधकाम उजेडात आले हा भाग निराळा. आमच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे कात्रजचा तो पाउस फार जोराचा झटका होता. लोकांना आठ वर्षापूर्वीचे 5,6 व 7 सालचे पाउस आठवत असतील. मुंबईचा प्रलय, महाराष्ट्रातील सांगली, पुणे कोल्हापूर येथील मोठे पाउस हे प्रकार अजून असे आठवणीत आहेत की, विसरणेच अशक्य आहे. तशी स्थिती यावर्षी उत्तराखंड व विदर्भात झाली आहे. तेथे प्रलय हे शब्दही अपुरे पडत आहेत. या सगळ्याची सामान्य माणसाने दखल घेणे आवश्यक आहे. कारण उत्तराखंडचा धोका हवामान तज्ञांनी वर्तवला होता. महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा अंदाज या वर्षाच्या प्रारंभी आम्ही व्यक्त केला होता. त्याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली असती तर नुकसान टळले असते.

ग्रामीण भागात आता सुशिक्षित तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांनी हवामानाचे अंदाज बघणे व त्या माहितीचा वापर करणे आवश्यक आहे. सर्वसाधारपणे हवामानाच्या अंदाजाची टिंगल केली जाते. एखाद्या वोळी अंदाज चुकला तरी ते अंदाज गांभिर्याने घ्यावेत कारण त्यानुसार पीकपद्धतीची रचना केली तर पावसाची शक्यता दुष्काळाची असो की अतिवृष्टीची असो, त्याचा वेध घेवून जर पीक रचना केली तर कोरडवाहू शेतीचे व बागायत शेतीचेही नुकसान होणार नाही. आजपर्यंत यागोष्टीकडे लक्ष देण्याची पद्धती नव्हती पण आता पावसाचा वेध तर घेता येतोच पण मोठ्या घटना :एक्स्ट्रीम ईव्हेंट: चा भयानक परिणाम टाळता येऊ शकतो. याचे दुसरे कारण असे की, आपणच निर्माण केलेल्या निसर्गातील असंतुलनामुळे पर्यावरण बिघडले आहे व याचा परिणाम म्हणून निसर्गच अनियमित होवू घातला आहे. त्यामुळे आपण रेल्वे, बसगाड्या व विमान सेवा याकडे जसे लक्ष देतो त्याच प्रमाणे हवामानाचे स्वरुप समजूत घेण्यासाठी प्रत्येकाने एक पाउल पुढे आले पाहिजे.

यावर्षीचा अंदाज सांगताना ते म्हणाले, पुढील दोन महिने यावर्षी अजून परिणामकारक पावसाची शक्यता आहे. पण रब्बीच्या काळात पाउस कमी राहणार आहे. त्यामुळे रब्बीवर यावेळी जादा अवलंबून राहता येणार नाही. खरीपाच्या मोसमात यावेळी विक्रमी उत्पादन होईल. पण द्राक्षाच्या पिकाला हा जादा पाउस मानवणार नाही. उसाचे उत्पादन चांगले होईल. गेल्या वर्षी पावसाने जेवढी ओढ दिली तेवढ्या प्रमाणात यावेळी तो अधिक पाउस देताना दिसत आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. सोबत या आठवड्यातील महाराष्ट्रातील पावसाचे स्वरूप दाखवणारा नकाशा दिला आहे, त्यात बहुतेक ठिकाणी वीस टक्क्यापेक्षा अधिक पाउस झाला आहे, असेही त्यानी स्पष्ट केले.

Leave a Comment