मटका किंग सुरेश भगत ह्त्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप

मुंबई- मुंबई सत्र न्यायालयाने मटका किंग सुरेश भगत खूनप्रकरणी त्याची पत्नी जया, मुलगा हितेशसह सहा जणांना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सर्व दोषींना न्यायालयाने ४० हजारांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने सुहास रोगे, किरण आंबोळे, हरीश मांडवीकर आणि प्रवीण शेट्टी यांनाही या खटल्यात दोषी ठरवले आहे. सुरेश भगत हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याची पत्नी जया, मुलगा हितेशसह सहा आरोपींना शुक्रवारीच दोषी ठरवले होते.

अलिबाग न्यायालयातील सुनावणीसाठी जात असताना १३ जून २००८ रोजी भगतच्या ‘स्कॉर्पियो’ गाडीला अलिबाग-पेण रस्त्यावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात भगत याच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या एक आठवडय़ापूर्वीच भगतने पत्नी जया आणि सुहास रोगे यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्याचप्रमाणे अपघात ज्या संशयास्पद प्रकारे घडला होता. त्यामुळे हा अपघात आहे की यामागे घातपात आहे या दृष्टीनेही पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यांना त्यात यश येऊन भगतचा अपघात नव्हे, तर हत्या घडविण्यात आल्याचे उघड झाले आणि ही हत्या अन्य कुणी नाही, तर त्याची पहिली पत्नी जया आणि मुलगा हितेशने केल्याचेही स्पष्ट झाले.

मुंबई सत्र न्यायालयाने भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२, १२० बी आणि ३४ नुसार सर्व आरोपींना दोषी ठरवले. या प्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेले किरण पुजारी आणि शेख अझीमुद्दीन यांना न्यायालयाने माफी देत सुटका केली.

Leave a Comment