पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाचे ममनून हुसेन यांची निवड

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाचे ममनून हुसेन यांची निवड झाली आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पाकिस्तानचे बारावे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले आहेत. सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे ते उमेद्वार होते. सप्टेंबर महिन्यात ते आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.

असिफ अली झरदारी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक घेण्यात आली. वेळापत्रकाप्रमाणे 6 ऑगस्टला ही निवडणूक होणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार 30 जुलैला ही निवडणुक घेण्यात आली. निवडणुकीचे वेळापत्रक बदलण्यात आल्यामुळे झरदारी यांच्या पीपीपीफने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरिके इन्साफफ पक्षाचे उमेदवार वजिहुद्दीन अहमद यांच्याशी हुसेन यांची लढत होती. तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे राझा रब्बानी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. हुसेन यांचा या निवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. त्र्याहत्तर वर्षीय हुसेन यांचा भारतात जन्म झाला आहे. 1947 साली फाळणीच्यावेळी त्यांचे कुटूंब पाकिस्तानात स्थलांतरीत झाले.