नॅनो खरेदी करा ऑनलाईन

पुणे – एखादा मोबाईल घ्यावा इतक्या सहजतेने ग्राहकाला कार खरेदी करता यावी यासाठी भारतातील मोठी वाहन कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने त्यांच्या स्वस्तातील मस्त नॅनोची विक्री ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रायोगिक पातळीवर नॅनोची कांही युनिट इंटरनेटवरून ऑनलाईन पद्धतीने विकली गेली असून आता हे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना कंपनीच्या विक्री विभागाचे अध्यक्ष रणजित यादव म्हणाले कांही पालकांनीच मुलांना सरप्राईज भेट म्हणून नॅनो दिल्याची उदाहरणे आहेत. नॅनोची विक्री कांहीशी मंदावलेली आहे त्यामुळे विक्रीवाढीसाठीही या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ज्यांना गाडीची किमत एकरकमी भरणे शक्य नाही त्यांना बुकींग रक्कम भरताच गाडी घरपोच दिली जाणार आहे अथवा नजिकच्या वितरकाकडून ते गाडी घेऊ शकतात. गाडीची एक्स शो रूम किमत १ लाख ६४ हजार इतकी आहे असे सांगून यादव म्हणाले की सध्या महिन्याला दोन हजार गाड्यांवर विक्री होत आहे त्यात घट झालेली नाही.

मध्यंतरी नॅनो विक्रीवाढीसाठी दुचाकीच्या बदल्यात एक्स्चेंज ऑफर म्हणून नॅनो विक्रीची स्कीम राबविली गेली होती. कांही काळ कॅश डिस्काऊंटही दिला जात होता मार्च महिन्यात के्रडीट कार्डवरही नॅनो दिली जात होती. सध्या सुलभ हप्त्यावर विना व्याज नॅनो विक्रीही सुरू असून १ लाखासाठी ८३३३ रूपये हप्ता ग्राहकांना द्यावा लागतो आहे असे समजते.

अर्थात गाडीची ऑनलाईन विक्री करण्याचा हा पहिला प्रकार नाही. यापूर्वी स्कोडाने त्यांची फॅबिया अशीच ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करून दिली होती. या प्रकारात वितरकांना द्यावे लागणारे कमिशन वाचते व त्यामुळे कंपनी रोख डिस्काऊंट ग्राहकांना देऊ शकतात.

Leave a Comment