एका आठवड्यात जादा चित्रपट आल्यास ते चालत नाहीतˆ-चाफळकर

पुणे, -मराठी माणूस दर आठवड्याला साधारणपणे एक चित्रपट बघतो, अशा वेळी जर पाच आणि सहा चित्रपट एका आठवड्याला आले तर कोणताही चित्रपट नीट चालत नाहीत तरी चित्रपट महामंडळाने निर्मात्यांना एकसंध करून एकाच दिवशी जास्त चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबतचे धोरण ठरवावे, असे मत सिटी प्राईड चित्रपटगृहाचे संचालक अरविंद चाफळकर यांनी व्यक्त केले.

मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी चाफळकर बोलत होते. महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, संचालक अलका कुबल, विजय पाटकर, सतीश बिडकर, ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी, राहुल सोलापुरकर, माजी अध्यक्ष भास्कर जाधव, चित्रपट कृती समितीचे अध्यक्ष, निर्माते मेघराज राजेभोसले आदी यावेळी उपस्थित होते. अरविंद चाफळकर म्हणाले, एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांना घाई झालेली असते. आमदार, मंत्र्यांचे पत्र घेऊन निर्माते येतात आणि चित्रपट लावायला सांगतात; मात्र, त्यातील अनेक चित्रपट एक आठवडाही चालत नाहीत, तरीही ते पुढे चालवावेत यासाठी दबाव आणला जातो. यात फक्त चित्रपटगृह चालकांचे नव्हे तर चित्रपटसृष्टीचे नुकसान आहे. यामुळे महामंडळाने या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

सोलापुरकर म्हणाले, चित्रपट निर्मात्यांना एकच वेळी चित्रपट प्रदर्शित करण्याची घाई झालेली असते ती फक्त पुण्यात, इतर ठिकाणी मात्र, मराठी चित्रपट पोहोचत नाहीत. यामुळे महामंडळाने चित्रपटाच्या वितरणासाठी राज्यभर नेटवर्क निर्माण करण्याची आवश्यकता अहे.

——————————————-

Leave a Comment