स्वतंत्र तेलंगणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली – अपेक्षेप्रमाणे स्वतंत्र तेलंगणला काँग्रेस कार्यकारिणी आणि यूपीए समन्वय समितीनं मान्यता दिली. त्यामुळे बुधवारी होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीवर मोहर उमटण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करावी, ही चार दशकांपासूनची मागणी पूर्णत्वाच्या मार्गावर असल्यानं तेलंगणमध्ये जल्लोष होत आहे.आंध्र प्रदेशात 23 जिल्हे असून त्यापैकी 10 जिल्हे तेलंगणात सहभागी केले जाणार आहेत.त्यामुळे विधानसभेच्या 294 जागांपैकी 119 आमदार तेलंगणातले असतील. यातून तेलंगणचं राजकीय महत्व स्पष्ट होत आहे.

तेलंगणच्या निर्मितीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा विरोध आहे.एवढंच नव्हे तर काँग्रेसचे अनेक आमदार आणि खासदारही तेलंगणाला विरोध करत आहेत. तरीही लोकभावनांचा विचार करून मागणी मान्य करत असल्याची काँग्रेसची भूमिका आहे.भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा छोट्या राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा आहे.त्यामुळे आता बोडोलँड आणि गोरखा लँडसाठी छेडलेली आंदोलने अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment