‘एमटीडीसी वेब’ वर मुंबई ,अजिंठा, वेरूळ आणि शिर्डी

mtdc2पुणे- ज्या राज्याचा पर्यटन व्याप देशात क्रमांक एकचा आहे,त्या महाराष्ट्रातील पर्यटनविभागाच्या म्हणजे एमटीडीसीच्या वेबसाईटवर फक्त मुंबई, अजिंठा -वेरुळ लेणी, शिर्डी याचाच उल्लेख आहे. जागतिक वारसा म्हणून नोंद झालेले कास पठार ,राज्यातील ऐतिहासिक किल्ले ,अभयारण्य, समुद्र किनारे या बाबत कोणतीच माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली नाही. प्रगत पर्यटन असा दावा करणार्‍या राज्याच्या एमटीडीसीच्या वेबपेजला भेट दिल्यास पर्यटन स्थळांबाबतच्या माहितीचा अभाव दिसून येतो. महाराष्ट्राच्या पर्यटनाविषयी माहिती मिळवण्यासाठी परदेशातील तसेच परराज्यातील लोकही वेबसाईटचा आधार घेतात पण अतिशय त्रोटक माहिती मिळत असल्याने त्यांच्या पदरी निराशा येते.

या वेबसाइटवर राज्यातील पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, पुणे यांचा अतिशय थोडक्यात उल्लेख केलेला आढळतो. शिवाय शनिवारवाड्याखेरीज कोणत्याच पर्यटन स्थळाचा उल्लेखही नाही. या वेबसाईटवरच्या बर्‍याच लिंक्स या ओपनही होत नाहीत. या बाबत एमटीडीसीच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या पाच-सहा वर्षांत पर्यटन स्थळांचा सुयोग्य विकास करून गुजरातने पर्यटन क्षेत्रात आघाडी घेतली आहे. शिवाय गुजरातने राज्यातील सर्व पर्यटन माहिती, व्यवस्था, विमानतळ, मुख्य शहरापासूनचे अंतर याची माहिती वेबासाईट वर दिली आहे. शिवाय आवश्यक तेथे पर्यटन स्थळांचे माहितीपटही अपलोड केले आहेत. परिणामी गुजरात पर्यटनाला विदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गुजराथ टुरिझमचे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला (एमटीडीसी) सध्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरची उणीव भासत आहे. सचिन तेंडुलकर आणि माधुरी दीक्षित-नेने यांची यासाठी निवड करण्याचा प्रयत्न झाला. पण या दोघांनीही नकार दिल्याने अजूनही एमटीडीसीला अ‍ॅम्बेसेडर मिळालेला नाही.

Leave a Comment