आंध्रप्रदेशात तणाव, तेलंगण विरोधक काँग्रेस आमदाराचा राजीनामा

हैदराबाद – आंध्र प्रदेशचे विभाजन करुन तेलंगण हे नवे राज्य करण्यास संपुआ आणि काँग्रेसच्या कार्यकारिणीने मंगळवारी मान्यता दिल्यानंतर येथील रायलसीमा आणि आंध्रच्या किनारपट्टीच्या भागात तणाव निर्माण झाला आहे. आंध्रप्रदेशच्या विभाजनाला विरोध करणा-या नेत्यांनी बुधवार सकाळपासूनच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रायलसीमा तसेच आसपासच्या परिसरातील शाळा, सरकारी तसेच खाजगी कार्यालये उर्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली आहेत.

अनेक आंदोलकांनी आरटीसीच्या गाड्या रोखून धरल्या. सुरक्षेच्या कारणास्तव आंध्र प्रदेशच्या वाहतूक विभागाने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, या बंदमुळे कोणीही हिंसक घटना घडल्याचे वृत्त अद्यापपर्यंत नाही. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागासह रायलसीमा येथे विभाजनाला होत असलेला विरोध लक्षात घेता, या भागतील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत.

आंध्र प्रदेश विभाजनाला विरोध करणा-या आंदोलक विविध जिल्ह्यात एकत्र येऊन रॅली काढल्या. आंध्रप्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून
पंचायत निवडणूका होत आहेत.त्यापार्श्वभूमीवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासून मतदान शांतपद्धतीने सुरु आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ पेंडूरथीचे काँग्रेस आमदार पी.रमेश बाबू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी विधानसभेचे सभापती नादेनदला मनोहर यांना आपला राजीनामा पाठवून दिला. मी संयुक्त आंध्रप्रदेशचा समर्थक आहे. राज्याचे विभाजन करुन, स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याचा पक्षाचा निर्णय मला पटलेला नाही. आपला निषेध नोंदवण्यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी सांगितले.

संयुक्त पुरोगामी आघाडी आणि काँग्रेस कार्यकारी समितीने मंगळवारी स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीला एकमताने मंजूरी दिली. या निर्णयाने तेलंगणमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, आंध्रप्रदेशातील नेत्यांचा या निर्णयाला विरोध आहे.

Leave a Comment