मुंबई- आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला दणका दिला आहे. या प्रकरणाच्याग चौकशीसाठी बीसीसीआयने नेमलेली द्विसदस्यीय समिती हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे याप्रकरणात क्लीन चीट मिळालेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, त्यांचा जावई गुरुनाथ मय्यपन आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यांना पुन्हा चौकशीला सामोरे जावे लागण्या ची शक्याता आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहीत याचिका दाखल झाली असून यावर सुनवणीवेळी मंगळवारी हायकोर्टाने हा निकाल दिला.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने राजस्थान रॉयलच्या तीन खेळाडूसह बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई मयप्पन याला बेटिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली. राज कुंद्राने दिल्ली पोलिसांकडे बेटिंगची कबुली दिली. जावयाच्या सहभागामुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन पाय उतार व्हावे लागले होते. त्यानंतर याच्या चौकशीसाठी बीसीसीआयने उच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने रविवारी सादर केलेल्या अहवालात ठोस पुरावे सापडत नसल्याचे सांगत कुंद्रा, श्रीनिवासन आणि मयप्पन यांना फिक्सिंग प्रकरणात क्लीन चिट दिली. यामुळे श्रीनिवासन यांच्या बीसीसीआयतील परतीचा मार्ग मोकळा झाला होता.
मुंबई हायकोर्टात या विरोधात जनहीत याचिका दाखल झाली होती. त्यावर मंगळवारी हायकोर्टाने निकाल दिला. हायकोर्टाने बीसीसीआयची चौकशी समितीच बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी नेमलेली चौकशी समिती बरखास्त करुन नव्याने द्वीसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे श्रीनिवासन यांच्या परतीचा मार्ग आता लांबणीवर पडला आहे.