आता एफआयआर नोंदवा ऑनलाईन

मुंबई – पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही किंवा गुन्हा दाखल करताना त्याची तीव्रता कमी केली अशा अनेक तक्रारी आपण ऐकतो..पण यापुढे असं घडणार नाही. कारण आता महाराष्ट्रात एफआयआर ऑनलाईन नोंदवता येणार आहे.  देशातील सर्वात मोठे पोलिस दल म्हणजे महाराष्ट्र पोलिस दल. सद्रक्षणाय खल निघ्रहनायफ हे पोलिस दलाचे ब्रीद. येत्या स्वातंत्र्यदिनापासून पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक जिल्ह्यात ऑनलाईन एफआयआर पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे पोलिसांचा वेळ वाचणार आहे शिवाय गुन्ह्याच्या तपासात होणारा राजकीय हस्तक्षेप थांबणार आहे. सर्वात म्हत्वाचे म्हणजे दाखल झालेल्या गुन्ह्याची कागदपत्रे सार्वजनिक होणार असल्याने तपासात पारदर्शकता येईल. सध्या पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवायचा असेल तर किमान तीन तास लागतात. पण नव्या प्रणालीमुळे काही मिनिटातच हे काम होणार आहे. पोलिसांनाही तपास करताना काय तपास केला, कोणाचे जबाब घेतले याची माहिती ऑनलाईन नोंदवावी लागणार आहे.

ऑनलाईन पद्धतीसाठी सध्या पोलीस दलात प्रशिक्षण सुरु आहे. तपासावर नियंत्रण ठेवणं वरिष्ठांनाही त्यामुळे सोपं जाणार आहे. देशातून पळून जाणार्‍या गुन्हेगारांना रोखणंही त्यामुळे शक्य होईल. राज्याचे पोलिसदल हे मागील पाच दशकापासून परंपरागत पद्धतीनेच काम करत होतं. मागच्या काळात संगणकाशी निगडीत अनेक गुन्हे नोंद झाले आहेत, पण पोलिस या सर्वांचा तपास बुरसटलेल्या पद्धतीनेच सुरु होता. आता उशिराने का होईना ऑन लाईन पद्धत सुरु होत असल्याने खर्या अर्थाने महाराष्ट्र पोलिस दल आधुनिक पोलिस दल म्हणून ओळखले जाणार आहे.

 

Leave a Comment