तेलंगणा आज स्वतंत्र होणार; कडेकोट बंदोबस्ती

हैदराबाद: तेलंगाच्या मुद्यावर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंगळवारी दिल्लीत यूपीए समन्वय समिती आणि काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. १२ जिल्ह्यांचे वेगळे राज्य़ मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हैद्राबादमध्ये संघर्ष सुरु आहे. आजच्या बैठकीत सर्वानुमते स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या स्थापनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत आज होणा-या निर्णयामुळे हैद्राबादमध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

मंगळवारी संध्याकाळी चार वाजता यूपीए समन्वय समितीची बैठक होणार आहे. तर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक साडेपाच वाजता होणार आहे. त्यानंतर तेलंगणाचा महत्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे. तेलंगणाचा निर्णय झाला, तर हे देशातील २९ वे राज्य असेल. आंध्रच्या विभाजनातील कळीचा मुद्दा असलेल्या हैदराबादला केंद्र शासित प्रदेश करण्याची शक्यता जवळपास धुसर मानली जात आहे. मात्र सुरवातीची काही वर्षे हैदराबाद ही उर्वरीत आंध्र आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी असेल.

स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीची घोषणा आज होण्याची शक्यता असली, तरी नवीन राज्य आस्तित्वात येण्यासाठी अनेक प्रशासकीय सोपस्कार पार पाडावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात नव्या राज्याची निर्मिती नव्या वर्षात म्हणजे २०१४ च्या पहिल्या तिमाहीत होण्याची शक्यता आहे.आंध्र किनारपट्टी आणि रायलसीमा या आंध्राच्या प्रमुख विभागातील काँग्रेस नेत्यांनी आंध्रच्या विभाजनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच त्यांची मते विचारात घेतली जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment