तृणमूल कॉंग्रेसचा दणदणीत विजय

कोलकत्ता – पश्‍चिम बंगालच्या पंचायत निवडणुकांमध्ये बहुतेक जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेसने डाव्या आघाडीचा सङ्गाया करीत प्रचंड विजय मिळवला आहे. ग्राम पंचायतींच्या ३२०० जागांपैकी १८०० जागा तृणमूल कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. कॉंग्रेसला २४६ तर डाव्या आघाडीला ७५७ जागा मिळाल्या आहेत. अन्य पक्षांना आणि अपक्षांना ४३० ग्राम पंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. बांकुरा, पुरुलिया आणि पश्‍चिम मिदनापूर या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या बालेकिल्ल्यात तृणमूल कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे.

या तीन जिल्ह्यांशी संलग्न असलेल्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात सुद्धा तृणमूलला चांगले यश मिळाले आहे, पण याच जिल्ह्यातल्या नंदीग्राममध्ये मात्र हा पक्ष आश्‍चर्यजनकरित्या पराभूत झाला आहे. नंदीग्राममध्ये भूमी अधिग्रहणाच्या निमित्ताने झालेल्या लढ्यात ममता बॅनर्जी यांनी शेतकर्‍यांची बाजू घेतली होती. तेव्हापासून ममता बॅनर्जी यांचे राज्याच्या राजकारणातले महत्व वाढले. पण एरवी त्यांचा बालेकिल्ला ठरू शकणार्‍या या नंदीग्राम पंचायतीमध्ये तृणमूल कॉंग्रेसला बंडखोरीचा ङ्गटका बसला.

बर्दवान, बिरबून, हावरा, उत्तर चोवीस परगणा आणि हुगळी या जिल्ह्यात डाव्या आघाडीला धूळ चारून ममता बॅनर्जी यांनी आगेकूच चालू ठेवली. टाटा मोटार्सच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या सिंगूरमध्ये तृणमूलने १६ पैकी १२ ग्रामपंचायती जिंकल्या. पश्‍चिम बंगालच्या उत्तर भागात कॉंग्रेसचा वरचष्मा असल्याचे मानले जाते. परंतु या भागातल्या कुचबिहार, दक्षिण दिनाजपूर, उत्तर दिनाजपूर या जिल्ह्यामध्ये तृणमूल कॉंग्रेसने पाय रोवले आहेत.