सीसीटीएनएस प्रणालीची सुरवात पुणे पोलिसांपासून

पुणे दि.२९- देशभरातील पोलिस ठाण्यांत नोंदल्या गेलेल्या गुन्हेगारांची व गुन्ह्यांची माहिती देशातील सर्व पोलिस ठाण्यांना पुरविण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केलेल्या आधुनिकीकरण कार्यक्रमाची सुरवात पुण्यातून होत आहे. पुण्याच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यापासून या प्रकल्पाला प्रायोगिक पातळीवर सुरवात केली जात असून पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणार असल्याचे समजते.

देशातील सर्व पोलिस ठाणी एकमेकांना जोडण्यासाठी सीसीटीएनएस प्रणाली वापरली जात आहे. नॅशनल क्राईम ब्युरोने सर्व राज्यात ही प्रणाली राबविण्याची योजना आखली आहे. महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाण्यातून नोंदल्या गेलेल्या गुन्हेगारांची तसेच गुन्ह्यांची माहिती संकलनाने काम पूर्ण झाले आहे. ही माहिती डिजिटल स्वरूपात साठविली जाणार असून देशातील कोणत्याही पोलिस ठाण्यात गरज पडल्यास ती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे असे सीआयडी विभागातर्फे सांगण्यात आले. चतुःश्रृंगी पाठोपाठ पुण्यातील अन्य पोलिस ठाणीही ऑनलाईन पद्धतीने जोडली जाणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पोलिसांच्या तपास कामात सूसूत्रता येणार असून पारदर्शक पद्धतीन आणि तरीही जलद तपासकाम होऊ शकणार आहे. या प्रणाली नुसार पोलिसांकडे दाखल करण्यात येणार्‍या तक्रारीही ऑनलाईनच नोंदविल्या जाणार आहेत. त्यामुळे मागच्या तारखांना गुन्हे नोंदविण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. फिगर प्रिंट ब्युरो व न्याय वैद्यक प्रयोगशाळा यांच्याकडील माहितीही गरजेनुसार सर्व पोलिस ठाण्यांना मिळू शकणार आहे असे समजते.

Leave a Comment