शिर्डीत सीरियल किलर

शिर्डी – देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईनगरी शिर्डीत आज सकाळी तीन भिका-यांचे मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 15 दिवसांपूर्वी साईनगर स्टेशनवर दोन भिका-यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी तीन भिका-यांचा खून झाल्यानं शिर्डीवासीय ’सीरियल किलर’च्या भीतीनं हादरलेत. तर, पैशाच्या मोहापायीच या तिघा ’श्रीमंत’ भिका-यांची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

नगर-मनमाड हायवेवर हॉटेल कला साई परिसरात आज सकाळी एका भिका-याचा मृतदेह सापडला. त्यानंतर सरकारी विश्रामगृहाजवळ आणखी एका भिका-याची हत्या झाल्याचं निदर्शनास आलं, तर रेल्वे स्टेशन रस्त्यावर ज्ञानेश्वर मंदिराजवळ तिसरा भिकारी मृतावस्थेत आढळला. ही बातमी वेगानं शहरभर पसरली आणि नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

साईनगर स्टेशनवर दोन भिका-यांची हत्या झाल्याची बातमी 15 दिवसांपूर्वीच आली होती. अगदी तसाच प्रकार या तीन भिका-यांच्या बाबतीतही घडलाय. डोक्यावर सळी किंवा काठीने जोरदार हल्ला करून या भिका-यांची हत्या करण्यात आली आहे. हे तिघेजण 45 ते 50 या वयोगटातील असून पोलीस त्यांचं नाव – गाव शोधण्याचा प्रयत्न करताहेत.

शिर्डीत भिका-यांच्या खुनाचं जणू सत्रच सुरू झाल्यानं, कुणी ’सीरियल किलर’ शहरात शिरलाय का, या भीतीनं नागरिक अस्वस्थ झालेत. परंतु, पैशाच्या मोहापायी
भिकारीच भिका-यांना मारत असावेत, अशी दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. साईनगरी शिर्डीत दररोज हजारोंच्या संख्येनं साईभक्त येत असतात. ते गरिबांना अन्न दान करतात, पैसे दान करतात. त्यामुळे शिर्डीतील अनेक भिका-यांच्या खिशात भरपूर पैसे खुळखुळू लागलेत.

’प्राइम लोकेशन’वरच्या काही भिका-यांचं उत्पन्न तर हजारांत आहे. त्यांच्या खिशात पाच-दहा हजार रुपये अगदी सहज सापडतात. अनेक भिका-यांनी बँकेत खाती उघडली आहेत आणि गरजूंना व्याजानं पैसे देण्याचं कामही ते करतात. अशा श्रीमंत भिका-यांना लुटण्यासाठीच त्यांची हत्या केली जात असावी, अशी शंका लिसांना वाटतेय.या मारेक-याला शोधून काढण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

Leave a Comment