मराठीतला पहिला अ‍ॅनिमेशनपट ‘छत्रपती शिवाजी’

उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता म्हणून समस्त मराठी मनांवर ठसा उमटविणारा सहिष्णू राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत…त्यांच्या तेजस्वी जीवनावर आजवर अनेक कादंब-या, चित्रपट-मालिकांची निर्मिती झाली. त्यांच्या अद्वितीय कार्यकर्तुत्वाचा प्रभाव आजही जनसामान्यांवर पहायला मिळतो. निर्माते अझहर खान यांच्या ‘अनम अनम फिल्म प्रॉडक्शन’ कंपनीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विलक्षण जीवन चरित्र प्रथमच अ‍ॅनिमेटेड चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य़ म्हणजे ‘छत्रपती शिवाजी’ हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट मराठी सोबत हिंदी भाषेतही बनविण्यात आला आहे. येत्या २ ऑगस्टला हा चित्रपट सिनेमागृहात सर्वत्र झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अझहर खान आणि आनंद सिंग यांनी केले आहे. ३०० वर्ष पारतंत्र्यात भरडल्या गेलेल्या रयतेला शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखविले. मुघल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशी चहूबाजूंने आक्रमक होत असताना शिवरायांनी मर्द-मराठ्यांच्या मनात स्फुलिंग चेतवलं आणि बघता-बघता त्याचा वणवा झाला. त्यांच्या शौर्याच्या, क्रांतीच्या गाथा आजही आपण मोठ्या अभिमानाने पाहतो, ऎकतो. हास सर्व दैदिप्यमान इतिहास ‘छत्रपती शिवाजी’ या अ‍ॅनिमेशनपटातून पुन्हा आपल्या समोर येणार आहे.चित्रपटासाठी कथा-पटकथा-संवाद लेखन जगमोहन कपूर, अझहर खान व कार्तिकेय तिवारी यांनी मिळून केले आहे. गीतकार कार्तिकेय तिवारी, आनंदु यांनी लिहिलेल्या या गीतांना कार्तिकेय तिवारी, राम गौतम या संगीतकार व्द्यींने संगीत दिले असून सद्याच्या आघाडीच्या गायकांनी यातील गीते गायली आहेत. कैलाश खेर, जावेद अली, साधना सरगम, मधुश्री, संजीवनी अमेय या सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजात यातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहे. रसूल खान, अमितकुमार सिंग यांनी चित्रपटाच्या सह-निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे.

Leave a Comment