घोषणाबाजीमुळे विधानसभा तहकूब

मुंबई- विविध कारणाने सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरूच आहे. अशास्वरूपाचा आरोप करीत विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठिय्या मांडला आहे. विरोधकाकडून करण्यात येत असलेल्या घोषणाबाजीमुळे सभागह दणाणले. या सर्व प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांनी कामकाज सोमवारी सकाळी एक तासासाठी तहकूब केले.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते आणि मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या निलंबनामुळे आणि सिंचनावरील चर्चा नाकारण्यावरून दोन्ही सभागृहातील सदस्य आक्रमक झाले आहेत. सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करीत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. त्यामुळे त्यांनी सकाळी कामकाज सुरू झाल्यानतर अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठिय्या मांडला.

दुसरीकडे विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज सुरूवातीलाच १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विधीमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाबाहेरील पाय-यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली सदस्यांनी विधीमंडळाबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे सोमवारी दोन्हि सभागहाचे कामकाज सुरळीत पार पडणार की नाही याबाबत शंका उपसिथत होत आहे.

Leave a Comment