वॉशिग्टन दि.२९ – कोणत्याही पृष्ठभागावर सहज चालू शकणारा, उंच चढू शकणारा, उलट सुलट उड्या मारू शकणारा आणि पुल अपस् काढू शकणारा सहा पायांचा रोबो तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. या रोबो झेपही घेऊ शकतो व त्याच्या मार्गात असलेले अडथळे ओळखून आपला मार्ग काढू शकतो. याचा उपयोग आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरेल असा संशोधकांचा दावा आहे.
आर हेक्स असे याचे नामकरण केले गेले असून त्याचा अर्थ आहे रोबो हेक्सापॉड. पेनासिल्व्हीया विद्यापीठातील संशोधकांनी हा रोबो बनविला असून प्रा. डॅनियल या सबंधी सांगतात की हा रोबो आणीबाणीच्या परिस्थितीत ढिगार्यांवरही चढेल, वाळवंटही ओलांडू शकेल, उड्या मारून अडचणीच्या भागातून पलिकडे जाऊ शकेल आणि कितीही उंच जागी चढू शकणार आहे. याला चाकांऐवजी कृत्रिम पाय दिले गेले आहेत. अर्थात खडबडीत पृष्ठभागावर असे रोबो वापरताना खूप गुंतागुंतीची रचना करावी लागते मात्र या रोबोला ही हालचाल सहज करता यावी यासाठी त्याच्या पायात एकच जोड दिला गेला आहे.
सध्या संशोधक याच्या पुढच्या व्हर्जनवर काम करत असून हा रोबा लाईट वेट आहे. तो डबल जंप, फ्लिप, पुल अप यासारख्या क्रियाही करू शकणार आहे. त्याच्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.