किंगस्टन – ट्वेण्टी-२० सामन्यांच्या थरारक लढतीत शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एक धावेची आवश्यकता असताना पाकच्या झुल्फिखार बाबरने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून वेस्ट इंडीजवर दोन गडी राखून विजय मिळविला. पाकिस्तानने दोन ट्वेण्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
रोमहर्षक लढतीत पाकिस्तान विजयी
यापूर्वीच पाकने वन डे मालिकेत यजमानांवर ३-१ ने विजय मिळवून मालिका खिशात टाकली. डावखुरा फिरकी गोलंदाज झुल्फिखार बाबर (नाबाद १३ धावा) याने पदार्पणाच्या सामन्यात २३ धावांत ३ बळी तर मिळवले. त्याचबरोबर मार्लोन सॅम्युएल्सच्या अंतिम चेंडूवर षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पुढील ट्वेण्टी-२० लढतीत पाकिस्तानने यजमानांवर २-० असा विजय मिळविल्यास विंडीजला अव्वल स्थानावरून दुस-या क्रमांकावर यावे लागणार आहे.
विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कायरॉन पोलार्ड (नाबाद ४०), मार्लोन सॅम्युएल (२५), डॅरेन ब्राव्हो (२५) व कर्णधार डॅरेन सॅमी (१४ चेंडूंत ३० धावा) यांनी प्रमुख धावा काढल्यामुळे ‘यजमान’ वेस्ट इंडीजने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावा काढल्या. विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाककडून उमर अमिनने ३४ चेंडूंत ९ चौकारांनीशी ४७ धावा काढल्या. त्यानंतर अमर अकमल (९), हम्माद आझम (१०) लवकर बाद झाल्यावर शाहिद आफ्रिदी मैदानावर आला. त्याने ४ चौकार व २ षटकांसह २७ चेंडूंत ४६ धावा कुटून काढल्या, परंतु आफ्रिदी बाद झाल्यावर पाकिस्तानी संघात पुन्हा पसरला होता. परंतु सामन्यात पर्दापण करून तीन बळी घेणा-या झुल्फिखार बाबरने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून दोन ट्वेण्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.