मोदी लढविणार नितीशकुमारच्या मतदारसंघातून निवडणूक

पाटणा – आगामी लोकसभा निवडणूक भाजपचे प्रचार समितीचे प्रमुख तथा गुजरातचे मुख्यामंत्री नरेंद्र मोदी हे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नालंदा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी तयारी गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सुरू करण्यात आल्याचे समजते. यास वरिष्ठ भाजप नेत्याने दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात बिहारच्या राजकरणात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींमुळेच बिहारमध्ये जनता दल संयुक्तने भाजपशी फारकत घेतली होती. यानंतर जदयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, शरद यादव यांनी भाजपवर आरोपांची झोड उठवली होती. त्याहनंतर मोदींनीदेखील जदयूला धडा शिकवण्याची भाषा केली होती. त्यामुळे यावेळेसची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.पी.ठाकूर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ‘नरेद्र मोदी बिहारमधील नालंदा येथून निवडणूक लढवू शकतात. मोदींनी बिहारमधून निवडणूक लढवावी यासाठी बिहारमधील स्थानिक नेत्यांची देखील मागणी असून मोदी त्यांची मागणी मान्य करतील अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.’ लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजप नेत्यांनी नालंदा येथूनच सुरुवात केली आहे. मोदींचे बिहारमधून निवडणूक लढवण्याचे हे संकेत मिळत असल्याचे काही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment